Juneed Khan Congress joining
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी आपल्या सर्व पक्ष पदांचा राजीनामा दिल्यानंतर आज (दि.१३) त्यांनी अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या अल्पसंख्यांक विभागात मोठी पोकळी निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळातही या हालचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मागील दहा वर्षांपासून भाजपा संघटनेत सक्रियपणे कार्यरत असलेले जुनेद खान यांनी पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री, भाजप कार्यकारिणी सदस्य तसेच नागपूर महानगरपालिका कोअर कमिटीचे कायम निमंत्रित सदस्य या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते.
रविवारी त्यांनी आपला राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सादर केला. तसेच त्याची प्रत अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुल्तानी आणि संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनाही पाठवण्यात आली. राजीनाम्यात त्यांनी नमूद केले आहे की, “मी मागील दहा वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य केले आहे, मात्र काही वैयक्तिक कारणास्तव सध्याच्या जबाबदाऱ्या पार पाडणे शक्य होत नसल्याने मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे.
या राजीनाम्यानंतर अल्पसंख्यांक मोर्चात अस्वस्थता पसरली असून, त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्य भाजपातील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर जुनेद खान यांनी आज, १३ नोव्हेंबर गुरुवारी, मुंबई दादर येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या सोबत संतोष गोहणे व सतीश वनकर यांनीही पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधीमंडळातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते त्यांचा काँग्रेस प्रवेश संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. सतीश वारजूकर तसेच मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे राज्यातील काँग्रेस पक्षाला अल्पसंख्यांक समाजात नवी ताकद मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर दुसरीकडे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चासाठी ही मोठी धक्का ठरल्याचे मानले जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, जुनेद खान यांचा काँग्रेस प्रवेश हा राज्यातील अल्पसंख्यांक राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकतो.