चंद्रपूर

चंद्रपूरातील चड्डा ट्रान्सपोर्टवर आयकर विभागाचे छापे

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : कोळसा, लोहखनिज, सिमेंट, फ्लाय ऍश वाहतूक, खाजगी कोळसा पुरवठा, ओव्हर बर्डन काढून टाकणे इ. व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील प्रसिद्ध चड्डा ट्रान्सपोर्टचे मालक यांचे कार्यालय आणि निवासस्थानांवर एकाचवेळी दिल्ली,नाशिक व नागपूर येथील विशेष पथकाने कार्यालय ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई नेमकी कशासाठी हे मात्र कळू शकले नाही.दरम्यान ही कारवाई आयकर व जीएसटीसाठी असावी अशी चर्चा आहे.

सूत्राने दिलेल्या माहिती नुसार, आज बुधवारी (01 नोव्हेंबर) चड्डा यांच्या नागपूर आणि चंद्रपूर येथील कार्यालय व निवसस्थानी छापे टाकण्यात आले. यात दिल्ली, नाशिक आणि नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकांनी दिवसा 11.45 वाजता अचानक पोहचून कार्यवाही सुरू केली.

एमआयडीसी परिसरात असलेल्या चड्डा परिवहन (ट्रान्सपोर्ट)कार्यालयावर छापा टाकण्यात आला.  ज्यामध्ये 30 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चड्डा कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असलेल्या मनीष चड्डा यांच्या निवासस्थानावरही प्राप्तिकर विभागाच्या चंद्रपूरच्या एका स्वतंत्र पथकाने एकाच वेळी छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान  गुप्तता पाळण्यात आली शिवाय स्थानिक पोलिसांचा यामध्ये सहभाग नव्हता. यावेळी पत्रकारांना चड्डा ट्रान्सपोर्ट  कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारण्यात आला. चड्डा कुटुंबाची कार्यालये आणि निवासस्थानावरील कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची छाननी अजूनही सुरू आहे. कागदपत्रे, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंसह जप्त केल्या किंवा नाही हे कळू शकले नाही

१००० हून अधिक ट्रक आणि इतर अवजड वाहनांच्या ताफ्यासह चड्डा कुटुंब हे वाहतूक उद्योगातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. ते वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) आणि इतर कोळसा खाणींमध्ये खाजगी कोळसा पुरवठा आणि ओव्हर बर्डन काढणेआणि वाहतूक करणे यामध्ये देखील अधिकृतपणे गुंतलेले आहेत.चड्डा कुटुंबाशी संबंधित कंपन्यांची वार्षिक उलाढाल शेकडो कोटींमध्ये असल्याची चर्चा आहे.
या अनपेक्षित घडामोडीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून आयकर विभागाच्या तपासात प्रगती झाल्यावरच संपूर्ण माहिती स्पष्ट होईल.

वर्धेतील पोलिसांचा कारवाईत सहभाग

दिल्ली,नाशिक व नागपूर येथील किमान 30 अधिकारी चंद्रपूरात चड्डा ट्रान्सपोर्टची चौकशी करीत आहेत. कार्यालयाच्या परिसरात अन्य कुणालाही जाण्याची परवानगी नसून त्यासाठी वर्धेतील 30 ते 40 पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT