Pombhurna FDCM Forest Tiger Attack
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. सातारा भोसले येथील ५५ वर्षीय गुराखी उष्टू पोरेते यांच्यावर एफडीसीएम (FDCM) जंगल परिसरात गाई चारत असताना वाघाने अचानक झडप घालत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील सातारा भोसले येथील रहिवासी उष्टू पोरेते (वय ५५) हे गुरुवारी नेहमीप्रमाणे गावालगतच्या एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक ४४१ मधील जंगल परिसरात गाई चारण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ते जनावरे चारत असताना दाट झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. वाघाचा हल्ला अत्यंत वेगवान आणि भीषण असल्याने उष्टू पोरेते यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. वाघाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली.
या घटनेमुळे सातारा भोसले व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या भागात जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांमध्येही मोठी दहशत पसरली आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, प्रभावित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी आणि जंगल परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.