चंद्रपूर : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडल्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील खेडमक्ता व मरारमेंढा परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून कालव्यातील पाण्याचा प्रवाह आणि ते शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचत आहे की नाही, याची खातरजमा केली. पाहणीदरम्यान कालव्यावरील अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
गोसेखुर्द धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे का, याचा आढावा घेण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांसह खेडमक्ता आणि मरारमेंढा परिसरातील कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्यातील पाण्याचा प्रवाह, वितरण व्यवस्था तसेच शेतीपर्यंत पाणी पोहोचण्याची स्थिती याची त्यांनी बारकाईने तपासणी केली.
पाहणीदरम्यान कालव्यावरील काही ठिकाणी विकासकामे अद्याप अपूर्ण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश देत शेतकऱ्यांच्या हक्काच्या सिंचनाच्या पाण्यात कोणताही अडथळा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला.
यावेळी वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांना गती देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कालव्याची सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून सिंचनाचे पाणी शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत विनाअडथळा पोहोचेल, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकऱ्यांना केवळ पाणी सोडल्याची घोषणा करून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष प्रत्येक शेतापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी कालव्यावरील सर्व अडथळे दूर करून सिंचन व्यवस्था सक्षम करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोसेखुर्दच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष कालव्यावर जाऊन सिंचन व्यवस्थेची पाहणी करत प्रलंबित कामांवर प्रशासनाला धारेवर धरण्याची भूमिका वडेट्टीवार यांनी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, शेवटच्या शेतकऱ्यालाही हक्काचे पाणी मिळावे यासाठी त्यांचा पाठपुरावा कायम राहणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.