घटनास्थळी झालेली गर्दी.  pudhari photo
चंद्रपूर

'त्या' काँग्रेस नेत्याच्या घरी गोळीबार झाल्याच्या खाणाखुणा नाही : जिल्हा पोलीस प्रशासन

Police investigation : गोळीबार झाला नसल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : घुग्घूस येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु रेड्डी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पोलिसांनाच संशय आहे. घटनास्थळी गोळीबार झाल्याच्या कोणत्याही खाणाखुणा आढळून आलेल्या नाही. त्यामुळे 8 मार्च च्या “त्या” रात्री साडेआठच्या सुमारास रेड्डी यांच्या घरी गोळीबाराची घटना घडली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यांच्या घरी वरच्या मजल्यावर आढळुन आलेल्या बंदूकीच्या गोळीचा तपास सुरू आहे.

8 मार्च च्या रात्री आठ वाजताचे सुमारास घुग्घूस येथील काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजु रेड्डी यांचेवर त्यांच्या घरी गोळीबार झाल्याची घटना सर्वत्र पसरली. पहिल्या मजल्यावर किरायाने राहत असलेल्या अनुपसिंग चंदेल यांच्या पोर्च मध्ये एक गोळी आढळून आली. या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत  पोहचल्यांतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रेड्डी यांच्या समर्थकांची गर्दी झाली.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,  उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, तसेच पोस्टे प्रभारी अधिकारी यांचे समवेत फॉरेन्सिक टिम, बीडीडीएस, स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके, श्वान पथके तसेच शस्त्रागार आरमोरर टिम यांनी भेट देऊन घटनेची पहाणी केली. परंतु पोलिसांना या घटनेशी संबंधीत फारशी माहिती हाती लागली नाही. या प्रकरणी फिर्याद वरुन पोस्टे घुग्घूस येथे भारतीय हत्यार कायदान्वये कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला.

या गुन्हयात बॅलेस्टीक एक्सपर्ट यांना पाचारण करून तज्ञांचा अहवाल घेण्यात येणार असून त्यानंतर या प्रकरणाची माहिती समोर येईल. परंतु पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात रेड्डी यांच्या घरी त्या रात्री गोळीबार झाल्याचे काहीच चिन्ह दिसुन येत नसल्याचे पोलिसांनी प्रसिध्दीस दिलेल्या  पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनाच रेड्डी यांच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात संशय वाटत आहे. चार दिवसांचा कालावधी होऊनही पोलिसांच्या हाती फारसे काहीही धागेदोरे लागले नाहीत.

काल सोमवारी या घटनेचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले. आमदार विजय वड्डेटीवार यांनी हा मुद्दा उचलवून धरला. वड्डेटीवार व चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांच्यासह सत्ताधारी आमदारांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली. गृहविभागाने या प्रकरणाच्या मुळाशी जावून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी वड्डेटीवार यांनी केली. पोलिसांनी रेड्डी यांच्या घरी त्या रात्री घडलेल्या गोळीबार घटनेचा सखोल तपास सुरु  केला आहे. तसेच गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरवुन लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करु नये असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी पत्रकाद्वारे केले आहे. मात्र रेड्डी यांच्या घरी त्या रात्री खरचं गोळीबार झाला का? याबाबत सत्यता शोधण्याचे खरे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT