भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांना सापडलेले स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म  Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपुरात लुप्त झालेल्या स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्म आढळली;

Chandrapur Fossil Discovery | Prof. Suresh Chophane | जीवाश्मासोबतच पाषाणयुगीन अवजारे आढळली

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५ हजार ते १२ हजार वर्षादरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म आढळली आहेत. चंद्रपूर येथील खगोल आणि  भूशास्त्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी ही जीवाश्मे शोधून काढली आहेत. अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील हत्तीची दुर्मिळ  जीवाश्म महाराष्ट्रात पहिल्यांदाच सापडली आहेत. डायनोसोरनंतर महाकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच आढळली असून त्यासोबत पाषाणयुगीन अवजारे सुद्धा आढळून आली आहेत.

ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील सुमारे २५ हजार वर्षापूर्वी विदर्भात वास्तव्य करणाऱ्या  स्टेगोडॉन गणेश हत्तीची ( Stegodon Ganesa)  असल्याचा दावा वाडिया इन्स्टीट्युट ऑफ हिमालयन जिओलोजीचे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा यांनी केला आहे. हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षापूर्वी विलुप्त झाले होते. आजच्या आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. याच ठिकाणी एलेफास नामाडीकस ( Elephas Namadicus) या लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळले आहे.

प्लेईस्टोसीन या २ लाख ते ११ हजार ७०० वर्षाच्या कालखंडात भारतात हत्तींचे आणि पाषाण युगीन मानवांचे मोठ्या संख्येत वास्तव्य होते. याच काळाच्या शेवटच्या कालखंडात हिमयुग होते.जेव्हा हे हिमयुग वितळले तेव्हा भारतात प्रचंड महापूर आले आणि या महापुरात अनेक प्रजाती वाहून गेल्या. त्याच पुरातील गाळात ( अल्लुव्हींयम )  अनेक सजीवांचे पुरावे सापडतात. चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेले हत्ती हे १५ फूट उंचीचे विशाल जीव होते. आणि लुप्त झालेल्या स्टेगोडॉन हत्तींची ही जीवाश्मे महाराष्ट्रात प्रथमच मिळाली आहेत, अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली.

प्रा. चोपणे हे २०१९ ते २०२४ पर्यंत प्लेईस्टोन काळातील  गाळात जीवाश्मे शोधत होते. त्यांना २०२०-२१ मध्ये प्रथमच चंद्रपूर तालुक्यात वर्धा आणि पैनगंगा नदी पात्रात संगमाजवळ जीवाश्मे मिळाली. संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरु असतानाच २०२१-२२ मध्ये  वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्राच्या भागात  विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य  हत्तींची जीवाश्मे आढळली. त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले. ही सर्व जीवाश्मे त्यांनी घरी स्थापन केलेल्या सुरेश चोपणे रॉक म्युझियममध्ये संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी संग्रही ठेवली आहेत.

 हत्तीच्या मांडीची हाडे, डोक्याची कवटी,  छातीची हाडे आढळली

सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे,चर्वण करणारी दात (Molar) आणि डोक्याची कवटी, छातीची हाडे अशा अवयवांचा समावेश आहे. तसेच सुळे दाताचा एक तुकडा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेली असल्याने महत्वाचे पुरावे नष्ट झाले आहेत. परंतु अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत. सविस्तर उत्खननात ती बाहेर येवू शकतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगना मध्ये   आशियायी हत्तींची जीवाश्मे मिळाली आहेत. परंतु स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.

पाषाण युगीन मानवाची अवजारे आढळली

हत्तींच्या जीवाश्मासोबत पाषाणयुगीन मानवांनी बनविलेली दगडी अवजारे सापडली आहेत. एकाच ठिकाणी हत्तींची जीवाश्मे आणि पाषाण युगीन अवजारे सापडल्यामुळे मानव हत्तींची शिकार करीत होते, हे सिध्द होते. मानवाच्या अति शिकारीमुळे हत्ती विलुप्त होण्यास मदत झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हात कुऱ्हाडी  (हँन्ड एक्स), आणि इतर प्रकारची अवजारे आढळून आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT