वनमंत्री गणेश नाईक 
चंद्रपूर

मानव -वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार : वनमंत्री नाईक

वन अकादमी येथे ‘वाईल्डकॉन - 2025’ परिषद संपन्न

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात होत आहे. याचा अतिशय आनंद आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्यातील अनेक तज्ज्ञांनी या संवेदनशील विषयावर येथे चिंतन आाणि मंथन केले. चंद्रपूर येथे तत्ज्ञांच्या निष्कर्षातून निघालेल्या सकारात्मक उपाययोजनेतूनच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

वन अकादमी येथे ‘वाईल्डकॉन - 2025’ या दोन दिवसीय परिषदेचा समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (व्यवस्थापन) एम.एस.राव, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, चंद्रपुरचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, शोभा फडणवीस आदी उपस्थित होते.

मानवाने प्राण्यांच्या जागेत अतिक्रमण केले, की प्राण्यांनी आपल्या जागेत अतिक्रमण केले, हा संशोधनाचा विषय आहे, असे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, वन्यप्राण्यांची लोकसंख्या वाढली आहे, हे सत्य आहे. तसेच आपल्याकडे मानवी लोकसंख्या प्रचंड वाढली असून जमीन मात्र मर्यादीतच आहे. शिवाय वनांच्या क्षेत्रामधून विकास कामे होत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाची जागा कमी झाली आहे. त्यामुळेच मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाल्याचे निदर्शनास येते. माणूस आणि वन्यजीव सुद्धा जगले पाहिजे. त्यामुळे या विषयावर इतर देशांनी काय उपाययोजना केल्यात, त्याचा वरिष्ठ वन अधिका-यांनी अभ्यास करावा, असेही ते म्हणाले.

वनविभागात प्रत्येक क्षेत्रीय विभागानुसार किती अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्याचा अहवाल सादर करावा. चंद्रपुरातील टायगर सफारी प्रकल्पाला अधिक गतीने समोर नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा सफारीचे शुल्क कमी करता येईल का, याचे अधिका-यांनी नियोजन करावे. चंद्रपूर येथे दोन दिवसीय चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या प्रत्येक समस्या सोडविण्यात येतील. निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. यावेळी त्यांनी बांबूपासून बनविलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनाची पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT