Chandrapur tigress captured pudhari photo
चंद्रपूर

Chandrapur news: ४ महिलांचा जीव घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; वनविभागाची थरारक कारवाई

पवनपार तलाव परिसरात डार्ट मारून वनविभागाची मोठी कारवाई; गुंजेवाही हल्ल्यानंतर वाढवली होती कडेकोट निगराणी

मोहन कारंडे

Chandrapur news

चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. पवनपार तलाव परिसरात विशेष पथकाने सापळा रचून वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीतीच्या वातावरणाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला केला होता. या भीषण घटनेत चार महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. एकाच दिवशी झालेल्या सलग हल्ल्यांमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला होता. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली होती.

घटनेनंतर वनविभागाने संपूर्ण परिसरात मोठी शोधमोहीम सुरू केली. हल्ला करणारा वाघ नेमका कोणता आहे, हे निश्चित करण्यासाठी गुंजेवाही जंगल परिसरात २० ट्रॅप कॅमेरे आणि ३ मोशन सेन्सर लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच विशेष पथकाद्वारे दिवस-रात्र गस्त वाढविण्यात आली होती. वनाधिकाऱ्यांसह तज्ज्ञ डॉक्टर, ट्रँक्विलायझर टीम आणि बचाव पथक सतत जंगल परिसरात तैनात होते.

कॅमेरा ट्रॅप आणि पगमार्कच्या आधारे वाघिणीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. अखेर पवनपार तलावाजवळील जंगल भागात वाघीण दिसून आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत तिला डार्ट मारला. काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाल्यानंतर तिला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले.

वनविभागाच्या या कारवाईनंतर गुंजेवाही आणि परिसरातील गावांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात येत असला, तरी नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे. जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन, शेतीची कामे आणि जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांनी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे.

दरम्यान, पकडण्यात आलेली वाघीण हीच हल्लेखोर असल्याची प्राथमिक खात्री वनविभागाने व्यक्त केली असून पुढील वैद्यकीय तपासणी, डीएनए नमुने आणि कॅमेरा ट्रॅपच्या आधारे अंतिम पडताळणी करण्यात येणार आहे. या घटनेनंतर मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून जंगलालगतच्या गावांमध्ये सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT