चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले. या कारवाईत एकूण सुमारे १,६०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी अचूक माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी चंद्रहास अर्जुन मुन (वय ४७) यांनी सदर मोटारसायकल चोरीचा तक्रार अर्ज दाखल केला होता. फिर्यादी हे शामनगर येथे कामानिमित्त गेले असता त्यांनी त्यांची मोटारसायकल पानटपरीजवळ लॉक करून ठेवली होती. परंतु काही वेळानंतर परत आले असता मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तोंडी रिपोर्टवरून चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी गोपाल जिवन मालाकार (वय ३०) रा. शामनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपूर, आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख (वय २२, रा. फुटक नगर, एकता नगर, चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपींनी चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या मोटारसायकली विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 60 हजाराच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.