Firing on MNS office bearer in Chandrapur
मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याला पोलिसांनी नागपूर येथे उपचारासाठी हालवण्यात आले आहे. Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपुरातील मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे. ही घटना शहरातील मध्यवर्ती भागातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी (दि.4) घडली. अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली असून पोलिसांनी त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविले आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती आहे. 8 ऑगस्ट 2020 मध्ये दारू व्यवसायाच्या वर्चस्वातून बल्लारपूर शहरात सूरज बहुरिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्या प्रकरणात अमन अन्देवार आणि आकाश अन्देवार याला अटक केली होती. 2021 मध्ये आकाश अन्देवार याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर 12 जुलै 2021 मध्ये आकाश अन्देवार यांच्यावर रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये बहुरिया समर्थकांनी गोळीबार केला होता. आकाश ला त्यावेळी 3 गोळ्या लागल्या पण सुदैवाने तो बचावला होता मात्र अन्देवार बंधूंनी बहुरिया यांची हत्या केल्याने त्यांना संपविल्याशिवय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका बहुरिया समर्थकांनी घेतली होती.

गुरूवारी दुपारी अमन अन्देवार हे मित्राच्या कार्यालयात रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये येत असताना अचानक 2 युवक त्या ठिकाणी आले. एक युवक हा वाहनाजवळ थांबला होता तर दुसऱ्याने अन्देवार यांच्यावर गोळी झाडली आणि पळ काढला. जुन्या वादातून अन्देवार यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी येवून जखमी अन्देवार यांना ताब्यात घेवून तातडीने उपचारार्थ नागपूरला हलविले आहे. पोलिसांनी परिसरात आरोपीच्या शोधार्थ मोहीम राबविली, परंतु आरोपींचा शोध लागला नाही. या घटनेमुळे रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

SCROLL FOR NEXT