Akapur Tiger Attack Farmer Death
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी वासुदेव सितकुरा वेठे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर परिसरात निर्माण झालेल्या भीतीने नागरिक संतप्त झाले आहेत. रात्री बेरात्री वाघाची भ्रमंती सुरू असल्याने नागरिक दहशतीमध्ये जीवन जगत आहेत. त्यामुळे आज (दि.२८) शेकडो शेतकरी, शेतमजूर आणि महिला यांनी तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक दिली.
नागभिड तालुक्यातील आकापूर निवासी वासुदेव सितकुरा वेठे हा शेतकरी स्वत:च्या शेतात धानपिकाची पहाणी करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळभ् गेला होता. त्यावेळी वाघाने त्याचेवर हल्ला करून त्याचा बळी घेतल्यानंतर वाघाने आकापूर शिवारात दहशत माजविली आहे. शनिवारी सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर, त्याच रात्री वाघ पुन्हा घटनास्थळी आला. रविवारी रात्री गावात घुसून एका कुत्र्याची शिकार, तर सोमवारी रात्री एका डुकराची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. वाघाचा आकापूर शेतशिवारातच वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. या परिसरात धानाची लागवड करण्यात आली आहे. पिक शेवटच्या टप्यात कापणीला आले आहे. पिकाची कापणी सुरू असतानाच शुक्रवारी वाघाची घटना समोर आली आणि त्यानंतर निरंतर वाघाचा वावर असल्याने धान कापणीचा हंगाम मंदावला आहे. वाघाच्या भ्रमंतीमुळे शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत; मजूरही कामावर यायला तयार नाहीत. यामुळे धानाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकाचा वाघाच्या हल्यात बळी गेल्यानंतर वनविभागाने आकापूर परिसरात सात ट्रॅप आणि एक लाईव्ह कॅमेरा बसविल्याचे सांगितले जात असले तरी तीन दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वाघाचा बंदोबस्त न झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत आज मंगळवारी तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र कार्यालय गाठले. शिवाजी चौकातून सकाळी दहाच्या सुमारास शेतकरी शेतमजूर पायी चालत कार्यालयापर्यंत पोहोचल्या. आणि तिथे तीन तासांचे ठिय्या मांडला. “वनविभाग हाय हाय, वाघाला तत्काळ पकडा या घोषणांनी परिसर दणाणला.
वनपरिक्षेत्र अधिकारी शहा मॅडम कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त नागरिक काही काळ प्रतीक्षेत राहिले. सुमारे दीड वाजता शहा मॅडम कार्यालयात आल्यावर नागरिकांनी त्यांना घेरून प्रश्नांचा भडीमार केला. शेतकरी, महिला आणि तरुणांनी त्यांच्यासमोर वाघाच्या दहशतीचे वास्तव मांडले. धान शेतात पडलेले, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली, आणि रोजंदारी करणारे मजूर उपाशी बसलेले असल्याचे त्यांनी सांगितले. शहा मॅडम यांनी, मानवाच्या संसाराप्रमाणे वाघीणीचाही संसार असतो, त्यांचेही बच्छडे असतात, तेही प्रेम करतात आपल्या प्रमाणेच वाघीण आपल्या पिल्लांचे रक्षण करते, असे उदाहरण दिल्यावर महिलां चांगल्याच संतापल्या. यावर महिलांनी शहा मॅडम यांना, मृतक वासुदेव वेठे हा आमच्या गावचा कर्ता पुरुष होता. तो गेला, आता त्याच्या मुलांचे रक्षण कोण करणार? तुम्ही करणार का? अशा जळजळीत शब्दांत महिलांनी वनविभागाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या संतप्त आवाहनाने संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.
आज मंगळवारी तळोधी (बा.) कार्यालयाच्या समोर आकापूर व गंगासागर हेटी येथील महिला पुरूष, शेतकरी शेतमजूरांनी धडक दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते सतीश वारजुकर, शिवराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अमोल भाकरे, वन समिती अध्यक्ष तुकाराम निकुरे, माजी सरपंच विलास भाकरे आणि अन्य स्थानिकांची उपस्थिती होती. यावेळी वाघाचा बंदोबस्त किती दिवसात होईल अशी विचारणा केली परंतु समाधान कारक उत्तर मिळाले नाही त्यामुळे तिन दिवसात वाघाला पकडला नाही तर वन कार्यालयात ठिय्या मांडू असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिल्याने वनविभागाला धडकी भरली आहे. यावेळी वारजुकर व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आकापुर शिवारातील वाघाचा तीन दिवसांत करावा, तळोधी आकारपूर, आकापुर–बाळापूर मार्गावरील झुडपी झाडे २० फूटापर्यंत साफ करावीत, शेतकऱ्यांना धान कापणीसाठी संरक्षण द्यावे, पांदण रस्ते तयार करून सुरक्षितता वाढवावी आदी मागण्यांचे निवेदन प्रत्यक्ष शहा मॅडम यांना देण्यात आले. यावेळी वारजुकर यांचे हस्ते मृतक वासुदेव सितकुरा वेटे यांचे हस्ते वनविभागाचे वतीने मृतकाची पत्नी सरिता वेठे यांना 9 लाख 75 हजाराचा धनादेश सुपूर्द करून आर्थिक मदत करण्यात आली.
आम्ही शेतात जाणार नाही, अन्नधान्य द्या : महिलांचा प्रश्न
आजच्या ठियामध्ये आकापुर आणि गंगासागर हेटी येथील महिलांची भूमिका ठळकपणे जाणवली. त्या म्हणाल्या, आमचा संसार शेतीवर चालतो. जर वाघामुळे आम्ही शेतात जाऊ शकत नाही, आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, तर आमचे संसार चालविण्यासाठी वनविभागाने आम्हाला अन्नधान्य पुरवावे असा भावनिक प्रश्न केला. त्यांच्या या प्रश्नावर वनविभागाकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते. याचवेळी फोनद्वारे ब्रह्मपुरी येथील वरिष्ठ वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी आपली तक्रार आजच प्राप्त झाल्याचे सांगितल्याने वनविभागाचा गलथान कारभार उघड झाला. घटनेला तीन दिवस झालेत, तरी वरिष्ठांना माहिती नाही ? मग वनविभाग करतो तरी काय ? असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला. या घटनेनंतर वनविभागावर जनतेचा विश्वास उडाल्याचे स्पष्टपणे जाणवले. वाघाचा बंदोबस्त न झाल्यास तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.