चंद्रपूर : महाराष्ट्रातील जनजातीय कला, संस्कृती आणि पारंपरिक लोककलांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ अंतर्गत नागपूर विभागीय प्रादेशिक फेरी चंद्रपूर येथील शकुंतला लॉन्स येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या सांस्कृतिक महोत्सवाला जनजातीय कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनजातीय समाजाच्या पारंपरिक गोंघो पूजेने या सांस्कृतिक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
या प्रादेशिक फेरीत ६ जिल्हे, २२ तालुके आणि सुमारे ७९ गावांमधील १०३२ जनजातीय कलाकारांनी सहभाग नोंदवला. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांतील कलाकार या महोत्सवात सहभागी झाले. गोंड, कोलाम, माडिया, परधान आणि हलबी यांसारख्या विविध जनजातीय समाजांच्या कलाकारांनी आपल्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करत जनजातीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवले.
या महोत्सवात जनजातीय समाजाच्या पारंपरिक नृत्य, गायन, वाद्य वादन, हस्तकला आणि चित्रकला अशा विविध कलाप्रकारांचा समावेश होता. पारंपरिक वेशभूषा, लोकसंगीत, नृत्यशैली आणि वाद्यांच्या माध्यमातून जनजातीय समाजाच्या जीवनशैलीचे, श्रद्धांचे आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडले. हस्तकला आणि चित्रकलेच्या माध्यमातूनही कलाकारांनी आपल्या सर्जनशीलतेची ओळख करून दिली. विविध वयोगटांतील कलाकारांचा सहभाग हे या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
जनजातीय कलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, दुर्गम भागांतील पारंपरिक कलांना व्यापक ओळख मिळवून देणे आणि नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जनजातीय समाजातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची आणि इतर भागांतील कलाकारांशी सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची संधी मिळत आहे.
भगवान बिरसा कला संगम, धरतीग्रामोन्नती सेवा संस्था आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध कलाप्रकारांचे मूल्यमापन करण्यासाठी अनुभवी परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. नृत्य, गायन, वाद्य वादन, हस्तकला आणि चित्रकला या विभागांमधील कलाकारांच्या सादरीकरणांचे परीक्षण करण्यात आले.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांसाठी २,५०० रुपयांपासून २५,००० रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, आकर्षक स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उत्तेजनार्थ विशेष पारितोषिकांचीही तरतूद करण्यात आली होती. सहभागी सर्व कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाच्या विविध प्रादेशिक फेऱ्यांमधून निवड होणाऱ्या कलाकारांना राज्यस्तरीय स्पर्धेत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. आगामी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘जनजातीय गौरव दिना’निमित्त गडचिरोली येथे मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय महाअंतिम पार पडणार आहे.
जनजातीय समाजाच्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरत आहे. चंद्रपूर येथील नागपूर विभागीय प्रादेशिक फेरीच्या माध्यमातून विदर्भातील विविध जनजातीय समाजांच्या कला आणि सांस्कृतिक परंपरांचे एकत्रित दर्शन घडले.