Chandrapur Ekona Coal Mine accident file photo
चंद्रपूर

Chandrapur news: एकोणा कोळसा खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दबून चालकाचा मृत्यू

Ekona Coal Mine accident: वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाण क्रमांक-१ येथे कोळसा लोडिंग सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकाचा कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Ekona Coal Mine accident

चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाण क्रमांक-१ येथे गुरुवारी पहाटे कोळसा लोडिंग सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकाचा कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेनंतर खाण परिसरात खळबळ उडाली असून मृताच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळावा, अशी मागणी सहकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाण क्रमांक-१ येथे गुरुवारी पहाटे सुमारे पाच वाजताच्या सुमारास कोळसा लोडिंगचे काम सुरू असताना अचानक कोळशाचा मोठा ढिगारा वाहनावर कोसळला. या दुर्घटनेत वाहन चालक पुष्पेंद्र सिंह (वय ५५, रा. मध्य प्रदेश), चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक, हे कोळशाखाली दबले गेले.

घटनेची माहिती मिळताच सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना कोळशाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वेकोलि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आला असून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार करण देवतळे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृत चालकाचे सहकारी व हेल्पर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मृताच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत, योग्य भरपाई आणि न्याय देण्याची मागणी केली. या घटनेमुळे खाण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कोळसा लोडिंगच्या कामादरम्यान सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही कामगारांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT