चंद्रपूर : अपघातात मालक गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला, बैलबंडीतील एक बैल जागीच ठार झाला; मात्र या संकटाच्या प्रसंगात ‘शेरू’ या कुत्र्याने दाखविलेली निष्ठा उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेली. मालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, तरी शेरूने घटनास्थळ सोडले नाही. जखमी बैल आणि बैलबंडीची राखण करत तो जागेवरच थांबून राहिला. माणसांनाही अंतर्मुख करायला लावणारी मुक्या प्राण्याची ही निष्ठा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
धुक्यात ट्रकची बैलबंडीला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील नथू चचाने (वय ५२) आणि राजू कोडापे हे ‘शेरू’ नामक कुत्र्यासह बैलबंडीने तळोधी (बा.) नागभीड मार्गावरील पळसगाव येथील नदीतून रेती आणण्यासाठी जात होते. शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ओवाळा पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. पहाटेच्या वेळी परिसरात धुके अधिक असल्याने अज्ञात ट्रकने त्यांच्या बैलबंडीला जोरदार धडक दिली. या धडकेत एक बैल जागीच ठार झाला, तर बैलबंडीचालक नथू चचाने गंभीर जखमी झाले. त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. राजू कोडापे यांनाही किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
जखमी मालकाला रुग्णालयात हलविले
अपघातात गंभीर जखमी झालेल्या नथू चचाने यांना प्रथम तळोधी येथील डॉ. देशमुख यांच्याकडे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, मालकाला रुग्णालयात नेल्यानंतरही शेरू घटनास्थळावरून हलला नाही.
संकटातही शेरूने सोडली नाही साथ!
अपघातानंतरचा हा प्रसंग मन हेलावून टाकणारा ठरला. मालक जखमी अवस्थेत रुग्णालयात, एका बैलाचा मृत्यू आणि दुसरा बैल जखमी अशा परिस्थितीत शेरू बैलबंडीच्या जवळच थांबून राहिला. जखमी बैल आणि बैलबंडीची राखण करत तो जणू आपल्या मालकाच्या परतीची वाट पाहत होता.
बोलता येत नसले, तरी माणसांप्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही प्रेम, आपुलकी आणि नात्यांची जाणीव असते, याची प्रचिती या घटनेतून आली. संकटाच्या क्षणी शेरूने दाखविलेली साथ आणि निष्ठा पाहून उपस्थितही भावूक झाले.