Devayani Danav India World Records
चंद्रपूर, वरोरा : डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या ८४ सेकंदांत ४८ गुणाकारांची उदाहरणे सोडविण्याची अनोखी कामगिरी चंदीगड येथील इयत्ता सहावीतील देवयानी पारुल-दिनेश दानव हिने केली आहे. तिच्या या कौशल्याची नोंद इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून, जून महिन्यात तिला मेडल, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘वंडर किड ऑफ द वर्ल्ड’ पुरस्कारानेही तिचा सन्मान करण्यात आला आहे. देवयानी ही वरोरा तालुक्यातील उमरे परिवाराची नात असल्याने तिच्या कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
डोळ्यांवर पट्टी बांधून संख्या ओळखणे, बेरीज-वजाबाकी करणे अथवा गणिताची उदाहरणे सोडविणे हे आव्हानात्मक मानले जाते. मात्र एकाग्रता, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर देवयानीने हे कौशल्य आत्मसात केले आहे. तिने ८४ सेकंदांत ४८ गुणाकारांची उदाहरणे अचूकपणे सोडविली.
देवयानी सध्या चंदीगड येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. बालपणापासूनच तिला गणिताची विशेष आवड असून, नियमित अभ्यासासोबत तिने ब्लाइंडफोल्ड पद्धतीच्या प्रशिक्षणातून आपले कौशल्य विकसित केले.
गुणाकाराची उदाहरणे सोडविण्यासोबतच देवयानीला डोळ्यांवर पट्टी बांधून संख्या, चलनी नोटांवरील अंक, प्लेइंग कार्ड्सवरील अंक व रंग ओळखता येतात. तसेच लायसन्सवरील नाव ओळखण्याचे कौशल्यही तिने आत्मसात केले आहे.
देवयानीच्या आई पारुल दानव यांच्या माहितीनुसार, तिची गणितातील आवड आणि जिद्द लक्षात घेऊन डॉ. किरण काकडे यांच्या ‘माईंड ब्रेन अकॅडमी’च्या माध्यमातून दोन महिन्यांचे ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामुळे तिच्या एकाग्रता, फोकस, आत्मविश्वास आणि मानसिक क्षमतेला चालना मिळाली. त्यानंतर नियमित सरावातून तिने या कौशल्यावर प्रभुत्व मिळविले. देवयानी गेल्या तीन वर्षांपासून अबॅकसचे प्रशिक्षणही घेत आहे.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी चंदीगड येथील महाराष्ट्र मंडळात देवयानीने आपल्या कौशल्याचे विशेष प्रात्यक्षिक सादर केले. डोळ्यांवर पट्टी बांधून चलनी नोटांवरील अंक, प्लेइंग कार्ड्सवरील अंक व रंग तसेच लायसन्सवरील नाव ओळखण्याचा डेमो तिने उपस्थितांसमोर सादर केला. तिच्या या अनोख्या कौशल्याचे उपस्थितांनी कौतुक केले. महाराष्ट्र मंडळाच्या वतीनेही तिचा गौरव करण्यात आला.
देवयानी ही चिमूर येथील डॉ. कमलाकर उमरे आणि सौ. अल्का उमरे यांची नात आहे. नातीच्या या आगळ्यावेगळ्या कामगिरीबद्दल आजी-आजोबांनी तिचे अभिनंदन केले. देवयानीचे वडील दिनेश दानव हे पंजाब केमिकल्समध्ये जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत असून, त्यांचेही तिला मार्गदर्शन मिळते.