आपल्या जीवाची पर्वा न करता पुरात वाहून गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे जीव वाचविणाऱ्या दोन नागरिकांना चिमूर येथील वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शहिद बालाजी रायपूरकर विरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रांतीदिनी (दि.9) सुभाष डहारे आणि बाळू झोडे यांना गौरविले. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि शाल, पूस्तक आणि १००० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
चिमूर येथे पार पडलेलया गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील स्मुती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड भुपेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद बोरकर, राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे, जितेंद्र सहारे, वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव तुडूंब भरले होते. नदी नाल्यांना पुर आला होता. यावेळी दि.21 जुलै दिवशी चिमूर येथील पिंटू भरडे आणि नेरी येथील केशव श्रीरामे हे तळोधी व वाढोणा येथील चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमध्ये सेवेवर आले होते. दरम्यान सायंकाळी परत जात असताना नेरी सिरपूर मार्गावरील नाल्यावरील आलेल्या पुरातून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकी पुलावर बंद पडली. त्याच क्षणी पाण्याचा प्रवाह आल्याने दोघेही कर्मचारी नाल्यातून वाहून गेले. एक जण जवळ तर दुसरा काही अंतरावर दोघांनीही स्वत:चा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात झाडाला पकडले. झाडाला पकडून जिव वाचविण्यासाठी बराचवेळ धडपडत होते.
रेस्क्यू टिमला येण्यास बराचवेळ असल्याने चिमूरचे ठाणेदार बाकल यांनी अडेगाव येथील बाळू झोडे व सिरपूर येथील सुभाष डहारे यांना बोलावण्यात आले. दोघांनीही भरपावसात ट्युबच्या सहायाने त्या नाल्यात झाडाला अडकून असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पुरात बाहेर काढून जीव वाचविला. तसेच त्याच नाल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना बोथली येथील काही नागरिकांनी बाहेर काढले. त्यांच्या जिगरबाज कार्याची वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने दखल घेतली. यावेळच्या शहीद बालाजी रायपुरकर विरता पुरस्काराने सुभाष डहारे आणि बाळू झोडे तसेच बोथली येथील काही नागरिकांना गौरविण्यात आले.