चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी थेट सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याकरीता शहरातून क्रुझर जिप्सीच्या सेवेला सेवा सुरू होत आहे. वनमंत्र्यांनी या सेवेला हिरवी झेंडी दाखविली आहे. महिनाभरात सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यविषयाचे अनुषंगाने बैठक घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली संचालक, अशोक खडसे संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएम चंद्रपूर प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोरचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू, मध्य-चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोडू, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी सचिन शिंदे आदिंची उपस्थिती होती.
ताडोबा हे देशभरात व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आणि स्थानिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे चंद्रपूर शहरातून ताडोबात क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सादर केला होता. या मागणीला राज्याचे वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद या सेवेला हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन क्रुझर सेवेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. बैठकीत क्रुझरच्या मार्गाची वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींवर चर्चा झाली.
तसेच संजय सब्बनवार यांनी तयार केलेली गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ठेवली जाणार आहे. दिवंगत ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांनी बांबूपासून साकारलेले काष्ठशिल्पांसाठी वन विभागाद्वारे प्रदर्शनी दालन उभारण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले.
पर्यटन विकासाच्या दृष्टीन महत्वाचे पाऊल : आमदार जोरगेवार
“ताडोबा चंद्रपूरच्या पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण आहे. चंद्रपूर शहरातून क्रुझर सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना ताडोबाला जाण्यासाठी सोयीचे होईल. पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. ताडोबाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. स्थानिक व्यवसायालाही चालना मिळेल अशी प्रतिक्रीया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. महिनाभरात सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अंतिम तयारीला वेग आला आहे. दरम्यान क्रुझर बुकिंग करुन वेळेवर न येणा-या पर्यटकांच्या ठिकाणी दुस-या पर्यटकांना ताडोबा सफारीची संधी मिळेल असेही यावेळी सांगण्यात आले.