ओडिशातून आणलेली लाखोंची खेप जप्त; गांजासह आंतरराज्यीय तस्कर जेरबंद file photo
चंद्रपूर

ओडिशातून आणलेली लाखोंची खेप जप्त; गांजासह आंतरराज्यीय तस्कर जेरबंद

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कुंदन प्लाझा चौकात सापळा रचून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Consignment Worth Lakhs Brought from Odisha Seized; Interstate Smuggler Apprehended Along with Ganja

चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा चंद्रपूरमध्ये अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ८.०१५ किलो गांजासह एका आंतरराज्यीय तस्कराला अटक केली आहे. कुंदन प्लाझा चौक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून सुमारे २.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक महत्त्वाचा पुरवठादार जेरबंद केला आहे. दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई करत ८.०१५ किलो गांजा जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, ओडिशा राज्यातून गांजाची मोठी खेप चंद्रपूरमध्ये विक्रीसाठी आणली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर रोडवरील कुंदन प्लाझा चौक येथे नाकाबंदी करून सापळा रचला.

रात्री अंदाजे २ वाजताच्या सुमारास एक संशयित व्यक्ती प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे ८.०१५ किलो ओला गांजा (पाने, फुले व बियांसह) आढळून आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शहादेव ठाकूरदास मलिक (वय ५३) असून तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथील रहिवासी आहे. सध्या तो चंद्रपूर शहरातील राष्ट्रवादी नगर परिसरात राहत होता.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे २ लाख रुपयांचा गांजा तसेच एक जुना इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण सुमारे २.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपीने प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशा राज्यातून तस्करी करून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अमली औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल माडी गौरकार तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT