Chandrapur Municipal Corporation
चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.२०) स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात ही भाजप नेत्यांची विधान म्हणजे हवेतील पतंगबाजी असल्याचा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे, त्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपुरात कुणालाही तोडफोड करणे, नगरसेवक पळवणे यासाठी स्कोप नाही, त्यामुळे कोणी काहीही विधान केली, तरी काँग्रेसचाच महापौर होणार, असे सांगत वडेट्टीवार यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढली.
भाजपचे नगरसेवक काँग्रेसचाही संपर्कात असल्याचे संकेत वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. चंद्रपुरात जनतेने काँग्रेसला कौल दिला असल्याने तिथे जनतेला अपेक्षित असा काँग्रेसचा महापौर होणार, असे ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आल्याने या नगरसेवकांना चंद्रपुरात सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. महापौर पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला, हा त्यांचा अधिकार आहे, सर्वच गोष्टींबाबत शिवसेना पक्षातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. चंद्रपुरात काँग्रेस निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवक यांना महापौर बनवावे, अशी भूमिका आहे.