चंद्रपूर : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका संस्था असल्यामुळे निवडणूक आयोग व विरोधात आज शनिवारी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली.
आज शनिवारी राष्ट्रीय मतदारदिनी चंद्रपूरात काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात गांधी चौकात आंदोलन केले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, विनायक बांगडे, नंदू नागरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का संशयास्पद असून मतदार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संभ्रम व्यक्त करत असल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली.
निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी संस्थेची स्थापना केली आहे. देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे. परंतू मागील काही वर्षात निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती दिसून येत आहे. भाजपच्या काळात निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर संशय बळावला आहे. देशातील सर्वसामान्य जनतेचा व मतदारांचा विश्वास निवडणूक आयोगाने गमावला आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकाल अनाकलनीय व अविश्वसनीय असल्याचे सांगितले. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार व विविध आघाड्यांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन दिले.