चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेत आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केला. या घटनेचा निषेध म्हणून चंद्रपुरात आज (दि.२४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. त्यानंतर नागपूर शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
यावेळी मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक जैस्वाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. रमेशचंद्र दहिवडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, अनिरुद्ध वनकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, घनश्याम मुलचंदाणी, प्रवीण पडवेकर, नंदु नागरकर, चंदाताई वैरागडे, महिला अध्यक्षा सुनंदा ढोबे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बेबीताई उइके, प्रशांत भारती, अरूण भेलके, करिमभाई, सोयल रजा शेख, प्रशांत दानव, संतोष लहामगे, प्रमोद बोरीकर, गोपाल अमृतकर, राजेश अडुर, इस्माईल शेख, अंकित रामटेके, अजय महाडोळे, रामकृष्ण कोंद्रा, मनिष तिवारी, वसंता देशमुख, शालिनी भगत, सुनीता अग्रवाल, सिमा वाघमारे यांचेसह यासह काँग्रेस तथा महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले. यात केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे देशात व राज्यात वाढता गुंडाराज, महिलांवरील अत्याचार, भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान, परभणीतील वडार समाजातील भीमसैनिक - सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू, बीड जिल्हातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या, कल्याणमध्ये मराठी माणसावर गुंड पाठवून हल्ला या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, राज्यात कायदा सुव्यवस्था पुर्णपणे बिघडलेली आहे. हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा, पोलिसांचा बचाव करीत जनतेवर अन्याय करीत आहेत. देशातील जनतेने वारंवार मागणी करूनही जातीय जनगणना करण्यास व इव्हिएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्यास भाजपप्रणित सरकार टाळाटाळ करीत आहे. राज्यात सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. खोट्या योजना व खोट्या आश्वासनाने सत्तेत आलेले हे सरकार जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यात पुर्णपणे अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे कायद्याच्या या राज्यात संविधानाची उघड उघड पायमल्ली करून, गुंडाराज, अराजकता निर्माण होत असतांना केंद्र आणि राज्य सरकार मुग गिळून गप्प आहे. हे सरकार सर्व सामान्य जनतेला संरक्षण देण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांनी वरील सर्व बाबी लक्षात घेऊन तात्काळ प्रभावाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.