विजयानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरकरांचे आभार मानत जल्लोष साजरा केला  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Municipal Election Results | चंद्रपूर महापालिकेत मित्र पक्षांसह काँग्रेसचा झेंडा; आघाडीच्या जोरावर भाजपला धोबीपछाड

उद्धव ठाकरे गटाचा प्रथमच डंका; सहा जागांवर घवघवीत यश

पुढारी वृत्तसेवा

BJP vs Congress Chandrapur

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांच्या सहकार्याने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपकडून सत्ता काबीज केली आहे. संघटनात्मक बांधणी, स्थानिक समीकरणे आणि आघाडीतील समन्वय यामुळे काँग्रेसला निर्णायक यश मिळाले, तर सत्तेतील भाजपला प्रचारातील ताकद असूनही पराभव पत्करावा लागला. जनविकास सेनेसह काँग्रेस 30, भाजप 23, उबाटा 6, एम आयएम 1, बसपा 1,वंचित 2,शिंदे सेना 1 तर दोघा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शहराच्या राजकारणात मोठे सत्तांतर घडून आले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत स्वतंत्र लढत देत जनविकास सेनेचे नेते पप्पू देशमुख यांच्यासोबत युती केली होती. या युतीतून जनविकास सेनेचे3 उमेदवार विजयी झाले असून, काँग्रेस आघाडीचे संख्याबळ भक्कम झाले आहे.

भाजपसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. मागील कार्यकाळात पूर्ण सत्ता असतानाही यावेळी भाजपला ती कायम ठेवता आली नाही. काँग्रेसने आघाडीच्या सहकार्याने भाजपची धोबीपछाड करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

उद्धव ठाकरे गटाचा प्रथमच ठसा

या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होती. मात्र या युतीत शिवसेना ठाकरे गटानेच बाजी मारली. चंद्रपुरात प्रथमच उद्धव ठाकरे गटाचा डंका पाहायला मिळाला असून, त्यांनी तब्बल सहा जागांवर घवघवीत यश मिळवले आहे. राजकीयदृष्ट्या हे सहा नगरसेवक कळीचा घटक ठरणार असून, सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला त्यांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. दुसरीकडे, याच युतीतील वंचित बहुजन आघाडीला मात्र फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अपक्ष आणि छोटे पक्षांचे चित्र

निवडून आलेले दोन अपक्ष नगरसेवक हे पूर्वी काँग्रेसशी संबंधित असल्याने ते काँग्रेस आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ आणखी मजबूत झाले आहे.

एमआयएमने चंद्रपुरात प्रथमच खाते उघडत एक जागा जिंकली आहे. बसपानेही एका जागेवर विजय मिळवला आहे. मात्र आम आदमी पक्षाला यावेळी चंद्रपुरात खाते उघडता आले नाही.

माजी महापौरांचा पराभव, विरोधाभासी निकाल

या निवडणुकीतील लक्षवेधी बाब म्हणजे भाजपच्या माजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांचा पराभव. मागील भाजप सत्ताकाळात त्या महापौर होत्या. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही निवडणूक रिंगणात असताना पत्नीला पराभव पत्करावा लागला, तर पती संजय कंचर्लावार मात्र विजयी झाले.

काँग्रेसमध्येही धक्के

काँग्रेससाठीही काही धक्कादायक निकाल समोर आले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे महानगर अध्यक्ष संतोष लहामगे आणि माजी महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांचा पराभव झाला आहे. तरीही एकूण निकाल पाहता काँग्रेसची बाजू भक्कम राहिली आहे.

संघटनात्मक ताकद विरुद्ध प्रचारयंत्रणा

विशेष म्हणजे यावेळी चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत निवडणुकीची तयारी केली होती. बूथ पातळीवरील नियोजन, स्थानिक प्रश्न आणि समन्वय याचा काँग्रेसला मोठा फायदा झाला.

त्याउलट भाजपमध्ये प्रचाराच्या सुरुवातीलाच गटबाजीचे राजकारण दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार केला. किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार एकत्र प्रचारात उतरले, तरीही अपेक्षित राजकीय जादू यावेळी चालली नाही.

वडेट्टीवारांचा जल्लोष

विजयानंतर आमदार विजय वडेट्टीवार चंद्रपुरात दाखल झाले. त्यांनी चंद्रपूरकरांचे आभार मानत जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत आनंद व्यक्त केला. “भाजपच्या अपयशी कारभाराला जनतेने उत्तर दिले आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चंद्रपूर महानगर पालिका निकाल जाहीर

एकूण जागा 66, निकाल जाहीर 66

विजयी उमेदवार

शिवसेना ठाकरे - 6

काँग्रेस - 30

(मित्र पक्ष जनविकास सेनेचे 3 जोडून)

बीजेपी - 23

एम आयएम - 1

बसपा 1

वंचित 2

शिंदे सेना 1

अपक्ष 2

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT