चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरीता सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या सोबत बैठक घेत धान उत्पादकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्या लष्करी व इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला. शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी लक्षात घेता आर्थिक मदत मिळावी याकरीता सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या सोबत बैठक घेतली.
धानपिकांवर आलेल्या लष्करी अळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असून सदर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना दिले.