चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
चिमूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपींवर कठोर कारवाईसाठी संतप्त झालेल्या जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घातला. ठाण्यावर दगडफेक, अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, बाचाबाची व चिथावणीखोर वक्तव्य केल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. त्यामुळे (बुधवार) चिमुर पोलिस ठाण्यात जमावातील 19 संशयीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले. संशयीत आरोपींची धरपकड करण्यात आली. 19 पैकी राम गुलाब माने (वय 39), अभिषेक रमेश डायरे (वय 24) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची तुरूंगणात रवानगी करण्यात आली. इतर संशयीतांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चिमुर शहरातील 13 व 10 वर्षाच्या अल्पवयीन दोघी मुलींवर खाऊ देण्याचे आमीष दाखवून तेथीलच संशयित आरोपी नसिर वजीर शेख (वय 48) रसिद रूस्तम शेख (वय 58) यांनी अत्याचार केला. सोमवारी (14 एप्रिल) ला अत्याचार केल्याची घटना पीडित मुलीनेच आईला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्याच रात्री पीडित मुलीच्या आईने चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संशयित आरोपींवर कारवाईची मागणी केली. त्याचवेळी ठाण्यात शरण आलेल्या दोन्ही संशयित आरोपींना रात्रीच अटक केली.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेची माहिती चिमूर शहरात पसरताच नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. त्यांनतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन पोलिस ठाण्याला जमावाने घेराव घातला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपींना आमच्या स्वाधीन करा, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आली. त्यानंतर जमावाने पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. यामध्ये एक महिला पोलिस व एक होमगार्ड असे दोघे जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी प्रत्योत्तरात पोलिसांनी जमावावर लाठीमार करून प्रकरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात चिमूर पोलिस ठाण्यावर जमाव आणून घेराव घालणे, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपींना नागरिकांच्या ताब्यात देण्याची मागणी करणे, फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणे, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बाचाबाची व धक्काबुक्की करणे आणि पोलिस स्टेशनवर दगडफेक करून पेटवनू देण्याची धमकी देत पोलिस ठाण्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याने कायदा हातात घेऊन गैरकृत्य करणाऱ्या संशयित आरोपी निखिल भुते, लल्ला असावा, पंकज शिरभये, शुभम भोपे, राकेश सटोणे, बबलू जाधव, गोलू भरडकर, धीरज सातपैसे, संदीप कावरे, तेजस बोरसरे, विक्की कटारे, मनमीत कुंभारे, गौरव गौरकर, हर्ष कटारे, पवन बंडे, गोलू कापसे, विशाल सोरदे, राम गुलाब माने, अभिषेक रमेश डायरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान गुरूवारी या संशयितांची धरपकड करण्यात आली. त्यापैकी राम गुलाब माने (वय 39), अभिषेक रमेश डायरे (वय 24) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर दगडफेक केल्याचा संशय आहे. त्यांनतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.