चंद्रपूर : पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणा राज्यात भात रोवणीच्या मजुरीसाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांवर काळाने भीषण घाला घातला. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील मजुरांचे वाहन रामगुंडम येथे अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत तीन महिलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाला असून २७ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून मोठ्या संख्येने मजूर दरवर्षी तेलंगणात भात रोवणी व शेतमजुरीसाठी जातात. यंदाही पवना चक गावातील मजूर तेलंगणात गेले होते. काल सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शेतातील काम आटोपून आपल्या राहत्या खोलीकडे परत जात असताना रामगुंडम येथे त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अतुल वासुदेव सोनुले (वय ४५), अर्चना जनार्धन सोनुले (वय ४०), प्रभा सिताराम मोहुर्ले (वय ५६) आणि रंजना प्रभाकर शेंडे (वय ५०) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत तब्बल २७ मजूर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमधून दरवर्षी हजारो मजूर तेलंगणात हंगामी शेतीकामासाठी जात असतात. मात्र, काम संपवून परतत असतानाच घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही जिल्ह्यांत शोककळा पसरली आहे.