Warora Dangerous Electric Poles Removal Pudhari
चंद्रपूर

Warora News | वरोरा शहरातील गणेशोत्सवापूर्वी धोकादायक वीज खांब हटवा

महावितरणला अल्टिमेटम; १५ सप्टेंबरला पाहणी, विसर्जनापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Warora Dangerous Electric Poles Removal

चंद्रपूर : वरोरा शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच गणेश विसर्जन मार्गावरील जुने व कमी उंचीचे विद्युत खांब आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सव व दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी गर्दी होणार असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक वीज खांबांचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महावितरणच्या डीपीडीसी योजनेंतर्गत या कामासाठी सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून ११ मीटर लांबीचे ४४ विद्युत खांब तसेच सुमारे एक हजार मीटर केबल टाकण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, निधी मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

गणेश व दुर्गा विसर्जन उत्सव तोंडावर आला असून, विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत कमी उंचीचे खांब आणि विद्युत तारांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने कामातील विलंब महावितरणच्या अडचणी वाढवू शकतो. याची दखल घेत माजी नगरपरिषद सभापती शेख जैरुद्दीन (छोटू भाई) यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.

निवेदनातून ठेकेदारावर तातडीने कारवाई करून मंजूर काम गणेशोत्सव व विसर्जनापूर्वी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. कामाला त्वरित सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

निवेदन स्वीकारताना कार्यकारी अभियंत्यांनी १५ सप्टेंबर रोजी सकाळी संबंधित घटनास्थळाची पाहणी करून विसर्जनापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता महावितरण प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी बसंत विधाते, मोहसीन पठाण, रूपेश लांडे, गुलाब धोबे, अनिस शेख, नासिर शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT