Chandrapur Veterinary Clinic Issues
चंद्रपूर: वरोरा तहसिल अंतर्गत येणाऱ्या माढेळी येथील श्रेणी-१ पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टर व आवश्यक कर्मचारी नसल्याने नियमितपणे बंद राहत असल्याची तक्रार शेतकरी व पशुपालकांनी केली आहे. सुसज्ज इमारत उभी असतानाही प्रत्यक्ष उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील पशुपालकांना खासगी उपचारासाठी धाव घ्यावी लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
माढेळी हा परिसरातील महत्त्वाचा बैल बाजार म्हणून ओळखला जातो. विशेषतः सोमवारच्या बाजारदिवशी सुमारे ३० गावांमधून शेतकरी जनावरे घेऊन माढेळीत येतात. मात्र, दवाखाना बंद असल्याने आजारी जनावरांवर तातडीने उपचार मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
माढेळीपासून काही अंतरावर चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यांच्या सीमा एकत्र येतात. त्यामुळे या परिसरातील मोठ्या संख्येने पशुपालकांसाठी माढेळीतील पशुवैद्यकीय केंद्र महत्त्वाचे आहे. जनावरांच्या आजारपणाच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार न मिळाल्यास पशुधनाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते.
शासनाने येथे सुसज्ज इमारत उभारली असली तरी डॉक्टर, कंपाउंडर आणि शिपाई यांसारखी आवश्यक पदे रिक्त असल्याने या केंद्राचा अपेक्षित लाभ पशुपालकांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ इमारत उभारण्यापेक्षा त्याठिकाणी नियमित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
माजी सैनिक सचिन धात्रक यांच्यासह उपेंद्र हिकरे, विक्रम चंदनखेडे, वैभव देवतळे, जनार्धन आकूलवार आणि परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दवाखाना नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांसह आवश्यक कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.