Warora Goat Theft Case
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मजरा (रै.) येथे गोठ्यात बांधून ठेवलेली पाच बकरे चोरीला गेल्याच्या घटनेचा वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी चंद्रपूर येथील तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीला गेलेली पाच बकरे, कार आणि मोटरसायकल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मजरा (रै.), ता. वरोरा येथील रहिवासी किशोर अशोक कोल्हे यांनी २८ ऑगस्ट रोजी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली सुमारे २५ हजार रुपये किमतीची पाच बकरे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गुन्हा दाखल होताच तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. चोरीच्या मार्गाचा माग काढण्यासाठी हायवे रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी आपले खबऱ्यांचे जाळे सक्रिय करून संशयितांविषयी गोपनीय माहिती संकलित केली.
या तपासातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. पोलिसांनी चंद्रपूर येथील तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीला गेलेली पाच बकरे, कार आणि मोटरसायकल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.