Cyber fraud  File Photo.
चंद्रपूर

Cyber Fraud Chandrapur | 'हॅलो, एक हेल्प पाहिजे, करेल का?’ वरोऱ्यात सायबर फसवणुकीचा नवा फंडा

‘हेल्प पाहिजे’च्या मेसेजपासून फसवणुकीला सुरुवात, वाहन दंड, ई-चलनाच्या नावानेही सायबर भामट्यांचा सापळा

पुढारी वृत्तसेवा

Online Fraud Warora

चंद्रपूर : वरोरा शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सायबर भामट्यांनी नागरिकांना गंडा घालण्यासाठी नवा फंडा शोधून काढला आहे. व्हॉट्सॲपवर अनोळखी व्यक्तींकडून मदतीच्या नावाखाली संदेश पाठवून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर पैसे पाठविण्यास सांगणे, बनावट लिंक अथवा APK फाईल पाठवून ॲप डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत.

फसवणुकीच्या या प्रकारात सुरुवातीला व्हॉट्सॲपवर ‘हॅलो, एक हेल्प पाहिजे, करेल का?’ असा साधा संदेश पाठविला जातो. समोरच्या व्यक्तीने प्रतिसाद दिल्यानंतर ‘स्कॅनरमध्ये पाच हजार रुपये टाक दे, एक तासात परत करून देतो’ असे सांगून विश्वास संपादन केला जातो. नागरिकाने पैसे पाठविल्यानंतर विविध कारणे सांगून आणखी रक्कम मागितली जाण्याची शक्यता असते.

याशिवाय वाहनधारकांना लक्ष्य करण्यासाठी सायबर भामटे ई-चलन, वाहनावरील दंड, परवाना नूतनीकरण किंवा परिवहन विभागाशी संबंधित कागदपत्रांच्या नावाखाली बनावट लिंक अथवा APK फाईल पाठवत आहेत. ‘दंड त्वरित भरा, अन्यथा वाहनाचा परवाना निलंबित होईल’, अशा धमकीवजा संदेशांमुळे नागरिक घाबरून दिलेल्या लिंकवर क्लिक करतात.

लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा अनोळखी ॲप डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँकिंगशी संबंधित तपशील तसेच इतर संवेदनशील माहिती सायबर भामट्यांच्या हाती जाण्याचा धोका असतो. त्यानंतर खात्यातील रक्कम परस्पर वळती करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

अनोळखी लिंकपासून सावध राहा

नागरिकांनी व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा अन्य माध्यमातून आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणतीही APK फाईल किंवा अनोळखी ॲप डाउनलोड करू नये. वाहनाचा दंड, ई-चलन किंवा परवाना नूतनीकरणासंदर्भातील माहिती अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत माध्यमातूनच तपासावी.

सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता संबंधित बँकेशी संपर्क साधून व्यवहार रोखण्याचा प्रयत्न करावा. संशयास्पद व्यवहार किंवा लिंकच्या बाबतीत तातडीने सायबर गुन्हे नोंदविण्याच्या अधिकृत माध्यमाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी हाच सर्वात प्रभावी उपाय असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT