ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी आमदार करणदादा देवतळे यांच्या ‘पुष्पांजली’ निवासस्थानी धडक देत आपली व्यथा मांडली. Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | बोडखा (मो.) येथे वाघाची दहशत, ग्रामस्थांचा आमदार देवतळेंच्या निवासस्थानी आक्रोश

दोन-तीन दिवसांत बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Tiger Terror Warora Bodkha Chandrapur

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बोडखा (मो.) परिसरात वाघाचा दिवसा-ढवळ्या मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जाणेही धोकादायक बनल्याने संतप्त झालेल्या गावातील सुमारे १०० ते १२० महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.१२) वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणदादा देवतळे यांच्या ‘पुष्पांजली’ निवासस्थानी धडक देत आपली व्यथा मांडली.

बोडखा (मो.) परिसरात वाघाचा वारंवार वावर होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसा वाघ दिसत असल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतात जाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वन्यजीवांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार देवतळे यांच्याकडे केली.

ग्रामस्थांची परिस्थिती जाणून घेत आमदार करणदादा देवतळे यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी डीएफओ राजन तलमले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून बोडखा (मो.) येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने मांडला.

“येत्या दोन ते तीन दिवसांत वाघाचा तातडीने बंदोबस्त करा; अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल,” असा स्पष्ट इशारा आमदार देवतळे यांनी वन विभागाला दिला. आमदारांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत परिसरातील भीती कायम आहे. वन विभागाने युद्धपातळीवर कारवाई करून वाघाला जेरबंद करावे आणि नागरिकांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT