Vijay Wadettiwar 
चंद्रपूर

Vijay Wadettiwar | कंत्राटातून मलिदा लाटणाऱ्या ‘ठेकेदार आमदाराला’ जनतेच्या समस्यांची काय जाणीव? : विजय वडेट्टीवार

चिमूरच्या जनआक्रोश महामोर्चातून आमदार बंटी भांगडियांवर टीकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : शेतकरी संकटात, तरुण बेरोजगारीच्या विळख्यात आणि महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांपेक्षा कंत्राटांमध्येच अधिक रस असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. “कंत्राटातून मलिदा लाटणाऱ्या ‘ठेकेदार आमदाराला’ जनतेच्या समस्यांची काय जाणीव?” असा सवाल करत त्यांनी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. १८) चिमूर येथे काढण्यात आलेल्या जनआक्रोश महामोर्चात ते बोलत होते.

चिमूर पंचायत समितीजवळून मोर्चाला सुरुवात झाली. ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक व नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

शेतकऱ्यांनी पीकविमा भरूनही नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकारी यंत्रणांच्या दारात हेलपाटे मारावे लागत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. दुसरीकडे सत्तेतील लोक विकासाच्या नावाखाली कंत्राटांची गणिते मांडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“ज्यांच्या हातात जनतेने सत्ता दिली, त्यांनी जनतेच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी विधिमंडळात मागील बारा वर्षांपासून मौनव्रत धारण करून स्वतःच्या हिताचे राजकारण केले, तर जनता शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षांत गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत ८० टक्के सिंचन व्यवस्था करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केल्याचा दावा आ. वडेट्टीवार यांनी केला. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी रस्ते आणि इतर कंत्राटी कामे आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना देऊन त्यांना मालामाल करण्यापलीकडे काहीही केले नसल्याची टीकाही त्यांनी केली. “आम्ही ठेकेदारी करत नाही, सेवाधर्म निभावतो,” असे वडेट्टीवार म्हणाले.

प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनीही मोर्चाला संबोधित केले. चिमूरच्या आमदारांनी कंत्राट मिळवण्यापलीकडेही ‘पराक्रम’ गाजवला असून नागपुरात गरिबांच्या हक्काच्या घरावर कब्जा केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चिमूर विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशनची अनेक कामे रेंगाळली असून रस्त्यांची कामेही रखडली आहेत. जनतेची कामे होत नसल्याने मतदारसंघात विदारक परिस्थिती निर्माण झाल्याची टीका शिवानी वडेट्टीवार यांनी केली.

चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. पीकविमा नुकसानभरपाई, कर्जाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडल्या. चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, पीकविमा नुकसानभरपाई तातडीने द्यावी, पीककर्जमाफी करावी, सातबारा कोरा करावा, धानाला बोनस द्यावा आणि घोषित अनुदानाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोर्चाचे विशेष आकर्षण शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि बैलगाड्या ठरल्या. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने चिमूरमध्ये जनआक्रोशाचे चित्र पाहायला मिळाले. महिला आणि युवकांचाही लक्षणीय सहभाग होता. मोर्चाला प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. किरसान यांचे चिरंजीव ॲड. दुष्यंत किरसान, काँग्रेस पदाधिकारी विजय गावंडे, प्रा. राम राऊत, जुनेद खान, विजय घरत, गजानन बुटके, धनराज मुगले, किशोर शिंगरे, विवेक कापसे, खोजरम मरसकोल्हे, विनोद बोरकर, राजू लोणारे, इरफान खान यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT