चंद्रपूर : ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात उघडकीस आला आहे. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या महागड्या मोबाईलऐवजी पार्सलमध्ये कपडे धुण्याचे चार साबण आढळल्याने ग्राहकाला धक्का बसला. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने वरोरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वरोरा शहरातील गजानननगर परिसरात राहणारे अंशुल सक्सेना यांनी ऑनलाइन शॉपिंग साइटवरून शाओमी टर्बो ५ हा सुमारे ४४ हजार १९९ रुपये किमतीचा मोबाईल फोन ऑर्डर केला होता. या खरेदीसाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने संपूर्ण रक्कम भरली होती. काही दिवसांनंतर मोबाईलचे पार्सल त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, पार्सल उघडून पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. पार्सलमध्ये अपेक्षित मोबाईलऐवजी कपडे धुण्याचे चार साबण आढळून आले. महागडा मोबाईल मिळण्याच्या अपेक्षेने पैसे भरलेल्या सक्सेना यांना या प्रकारामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकारानंतर अंशुल सक्सेना यांनी संबंधित डिलिव्हरी कर्मचाऱ्याकडे चौकशी केली. तसेच वरोरा शहरातील पार्सल कार्यालयात जाऊनही या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
अखेर अंशुल सक्सेना यांनी या घटनेप्रकरणी वरोरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पार्सल पाठविण्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्यापर्यंत नेमकी चूक कुठे झाली, पार्सलमध्ये मोबाईलऐवजी साबण कसे आले आणि या प्रकाराला कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी भरलेली रक्कम आणि प्रत्यक्ष मिळणारे उत्पादन यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित विक्रेता, ई-कॉमर्स कंपनी आणि वितरण यंत्रणेकडून योग्य तो खुलासा मिळणे आवश्यक आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीतून नेमके काय समोर येते आणि ग्राहकाला न्याय मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.