Chandrapur Student Rights Protest Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Student Protest | ‘उलगुलान’चा एल्गार! विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी चंद्रपुरात जोरदार निदर्शने

आदिवासी वसतिगृह, पीएच.डी. अधिछात्रवृत्ती, वयोमर्यादा आणि आश्रमशाळांच्या प्रश्नांवर शासनाला इशारा

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Student Rights Protest

चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी, चंद्रपूर यांच्या वतीने गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘उलगुलान निदर्शने आंदोलन’ करण्यात आले.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधत ५ व १४ ऑगस्ट २०२६ रोजीचे आदिवासी वसतिगृह प्रवेशासंदर्भातील अन्यायकारक वयोमर्यादेची अट असलेले शासन निर्णय रद्द करणे, १ जुलै २०२६ चा शासन निर्णय रद्द करून बार्टी, महाज्योती, सारथी व टीआरटीआयमार्फत पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या जागा किमान ५०० करणे, बार्टीच्या प्रशिक्षण व अधिछात्रवृत्तीवरील ३० व ३५ वर्षांची जाचक वयोमर्यादा रद्द करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करावी, आदिवासी विकास मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राज्यातील सर्व आश्रमशाळांचे सामाजिक लेखापरीक्षण करून साळुंखे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आपला संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हक्कांशी तडजोड केली जाणार नाही आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनाला विद्यार्थ्यांचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संबंधित प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर, अनिकेत गोडबोले, अभिलाष चुनारकर, मोनाली पाटील, निलजय गावंडे, समीर शेख, अजय उराडे, सिद्धार्थ गणवीर, राहुल माशाटकर, नयन देशकर, नकुल कांबळे, मधुकर उराडे, डॉ. प्रज्ञाशील सहारे, ललिता दुर्गे, गिरिजा कोंडावर, सुमित्रा आत्राम, रेखा सोरते, सोजवल कुमरे, सिद्धार्थ चुनारकर, व असंख्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT