Chandrapur Drowning Incident 
चंद्रपूर

Chandrapur Drowning Incident : काळजाचा थरकाप! वर्धा नदीत बुडून वडील मुलीसह भाचीचा दुर्दैवी अंत; शोधमोहीम सुरूच

धानोरा गावाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील धानोरा गावाजवळील वर्धा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. त्यानंतर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु, रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. अद्याप एकाही मृतदेहाचा शोध लागलेला नाही.

चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गाव गावालगतच्या वर्धा नदीवर राजू कोडापे (वय 40) हे आपली मुलगी अर्पिता कोडापे (वय 12) आणि भाची प्रियांका मडावी (वय 14) यांच्यासह कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने राजू कोडापे हे खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. वडील बुडत असल्याचे पाहून मुलगी अर्पिता त्यांना वाचवण्यासाठी नदीत धावली. मात्र, तिलाही पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली. यानंतर भाची प्रियांका मडावी हिने वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. परंतु दुर्दैवाने तिलाही बाहेर पडता आले नाही आणि तिघेही पाण्यात बुडाले. हा सारा प्रकार अत्यंत वेदनादायक असून मदतीसाठी कोणीही वेळेत पोहोचू न शकल्याने तिघांचाही मृत्यू झाला.

राजू कोडापे हे राजुरा तालुक्यातील खामोणा गावचे रहिवासी असून ते आपल्या मुलगी अर्पितासह धानोरा येथे नातेवाईकांकडे आले होते. प्रियांका मडावी ही त्यांची भाची असून ती स्थानिक आहे. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र अंधार वाढत गेल्यामुळे आणि नदीतील परिस्थिती धोकादायक असल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, या घटनेत बुडालेल्या तिघांपैकी एकाही व्यक्तीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

प्रशासनाच्या वतीने उद्या सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असून स्थानिक बचाव पथक आणि पोलीस यांच्याकडून नदीत सखोल तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी नदीकाठी जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT