Chandrapur Tigress Captured  
चंद्रपूर

Chandrapur Tigress Captured | अखेर तिघांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद: मिंडाळा जंगलात वनविभागाची कारवाई

नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर, अड्याळमेंढा, नवेगाव रिठ आणि चिंधिमाल परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Mindala Forest Tigress Operation

चंद्रपूर : नागभीड वनपरिक्षेत्रात दोन जणांचा बळी घेऊन शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करणारी वाघीण T-61 SAF अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. शुक्रवारी (दि. २८ ) मिंडाला उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८७P मध्ये वनविभागाच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत वाघिणीला डार्ट करून बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर तिला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले. वाघीण जेरबंद झाल्याने जनकापूर, अड्याळमेंढा, नवेगाव रिठ आणि चिंधिमाल परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या वाघिणीने यापूर्वी दोन मानवी जीव घेतले होते. १९ मे २०२६ रोजी FDCM कक्ष क्रमांक १०९ मधील किटाडी मेंढा येथील वनिता शंकर उईके यांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी जनकापूर येथील ७४ वर्षीय रमेश जयराम काशिवार हे आपल्या शेतातील गट क्रमांक १६८ मध्ये काम करत असताना वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काशिवार यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर तुकोम येतील एका 65 वर्षीय वृद्धालाही याच वागिनीने ठार केले होते.

या सलग घटनांनंतर वाघिणीचा शेतशिवार तसेच गावालगतच्या परिसरात सातत्याने वावर दिसून येत होता. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवली होती. ५ ऑगस्टपासून वन अधिकाऱ्यांसह सुमारे ३० वनमजूर परिसरात गस्त घालत होते. तसेच कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघिणीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते.

डार्ट करून केले बेशुद्ध

मिंडाला येथील कक्ष क्रमांक 87 P मध्ये वाघीण आढळून आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली. पशुवैद्यकीय अधिकारी तथा RRT प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट तयार केला, तर पोलिस हवालदार व शूटर अजय सी. मराठे यांनी वाघिणीला यशस्वीपणे डार्ट केले. बेशुद्ध झाल्यानंतर वाघिणीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.

ही कारवाई उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे., वनपरिक्षेत्र अधिकारी भारती एस. बगमारे, वन्यजीव तज्ज्ञ राकेश आहुजा, क्षेत्र सहाय्यक एम. पी. तावाडे, वनरक्षक व अन्य क्षेत्रीय कर्मचारी तसेच RRT पथकाने कारवाईत सहभाग घेतला. वाघीण जेरबंद झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून भीतीच्या छायेत असलेल्या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT