गोंदिया-बल्लारशहा पॅसेंजरच्या धडकेत ‘बिट्टू’चा अंत 
चंद्रपूर

Chandrapur Tiger Death | वन्यजीवप्रेमींवर शोककळा : गोंदिया-बल्लारशहा पॅसेंजरच्या धडकेत ‘बिट्टू’चा अंत

बिट्टू उर्फ T-40 हा 14 वर्षाचा होता नरवाघ सिंदेवाहीपासून 2 किलोमिटर अंतरावर दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Wildlife Lovers Mourn: ‘Bittu’ Dies After Collision with Gondia-Ballarpur Passenger Train

चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभागातील सुप्रसिद्ध T-40 ‘बिट्टू’ या नर वाघाला रविवारी ( १२ ऑक्टोबर) रोजी रात्री सुमारे अकरा वाजताचे सुमारास गोंदिया–बल्लारशहा पॅसेंजर गाडी (क्रमांक ६८८०४) ने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिंदेवाही रेल्वे स्थानकापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कारगाट नियतक्षेत्र (कक्ष क्रमांक 1338/741) येथे घडली.

मृतक १४ वर्षांचा अनुभवी नरवाघ

सदर वाघाचे वय सुमारे १३ ते १४ वर्षांदरम्यान असल्याचे वनविभागाने सांगितले. हा वाघ ‘T-40’ या ओळखीने प्रसिद्ध होता व ब्रम्हपुरी परिसरातील अनेक जंगल पट्ट्यांमध्ये फिरत असे. स्थानिक लोक व वन्यजीवप्रेमी यांना त्याची ओळख “बिट्टू” या नावाने होती. घटनेची माहिती मिळताच NTCA चे काळे  आणि ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, ब्रम्हपुरीचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, सिंदेवाही च्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार, क्षेत्र सहाय्यक  नितीन गडपायले हे सर्व अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी मृतक वाघाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

शवविच्छेदन व अंत्यसंस्कार

यानंतर वाघाचा मृतदेह वन्यजीव रक्षक श्री. बंडू धोत्रे व NTCA प्रतिनिधी मुकेश भांदककर यांच्या उपस्थितीत TTC चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर वनविभागाच्या निर्धारित प्रोटोकॉलनुसार ‘बिट्टू’चे दहन करण्यात आले.

घटनेनंतर वनरक्षक आर. व्हि. धनविजय यांनी वनगुन्हा क्रमांक 08879/221953 अन्वये नोंद केली असून, या अपघाताबाबत सखोल तपास सुरू आहे.

‘बिट्टू’ची आठवण जिवंत राहील
T-40 ‘बिट्टू’ हा वाघ ब्रम्हपुरी – उमरेड – करंडला अभयारण्य क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध नरवाघांपैकी एक होता. T40 हे ब्रम्हापुरी वन विभाग (Brahmapuri Division) चे एक प्रसिद्ध वाघ होते. हे “बिट्टू” या नावाने ओळखले जायचे. बिट्टू हे उमरेड – करंडला अभयारण्याच्या भागातील वाघ जयचे पुत्र होते. त्याची उपस्थिती स्थानिक जंगल परिसंस्थेतील जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. त्याच्या निधनाने वनविभाग आणि वन्यजीवप्रेमी यांच्यात खोल शोककळा पसरली असून, “बिट्टू आता नाही, पण त्याचा ठसा कायम राहील” अशी भावना व्यक्त होत आहे.

वन्यजीव संरक्षणाविषयी चिंतेची लाट

या घटनेमुळे मानव–वन्यजीव संघर्षाची समस्या पुन्हा प्रकाशात आली आहे. या घटनेनंतर वन्यजीवप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिंदेवाही–ब्रम्हपुरी परिसरात वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात असून, रेल्वे मार्गांवरून वारंवार होणाऱ्या अशा घटना वन्यजीवांसाठी गंभीर धोका ठरत आहेत. तज्ञांच्या मते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे मार्गांवर ‘अंडरपास’ किंवा ‘ओव्हरब्रिज’ बांधकामाची गरज आहे, जेणेकरून वन्यजीवांचा सुरक्षित मार्ग खुला राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT