चंद्रपूर : मोहर्ली–पद्मापूर मार्गावर वाघाचा पाठलाग करत व्हिडिओ काढल्याचा प्रकार समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दिनांक 15 मार्च 2026 रोजी मोहर्ली–पद्मापूर रस्त्यावर काही नागरिकांनी आपली वाहने थांबवून वाघाचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी काही जणांनी रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा मार्ग अडवत त्याचा पाठलाग करत व्हिडिओ चित्रित केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
वनविभागाच्या माहितीनुसार, वाघाच्या भ्रमणमार्गावर वाहने थांबवून वन्यजीवांच्या हालचालीत अडथळा निर्माण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या घटनेत सहभागी असलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध वनगुन्हा क्रमांक 09654/211333, दिनांक 15 मार्च 2026 रोजी भारतीय वन अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून व्हिडिओमधील व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींबाबत कोणाकडेही माहिती असल्यास 9834689541 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत वनविभागाने नागरिकांना वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण न करण्याचे आणि वन्यजीवांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.