Chandrapur Tiger Attack Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | गोंडपिपरी तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला, शेतकरी महिलेचा मृत्यू

आठवडाभरापूर्वी चेंकपिपरी गावातील शेतकऱ्यांचे केले होते तुकडे तुकडे : दोघांनाही ठार मारणारा वाघ एकच असल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यातील गणेशपीपरी गावाच्या शेतशिवारात आज (रविवारी) सायंकाळी वाघाच्या हल्ल्यात अल्काताई पांडुरंग पेंदोर (वय 45) या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्काताई पेंदोर या  आपल्या शेतात एकट्याच कापूस वेचणीचे काम करत होत्या. सायंकाळी सुमारास ५ वाजताच्या दरम्यान वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचे पती पांडुरंग पेंदोर हे तेव्हा बैल घेऊन घरी परतले होते. मात्र, पत्नी घरी न आल्याने ते पुन्हा शेतावर गेले असता त्यांना पत्नीचा मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वी  गणेशपीपरीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकपिंपरी गावातही वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. विशेष बाब म्हणजे वाघाने सदर शेतकऱ्याचे तुकडे तुकडे केले होते. त्यामुळे आठवडाभरात दोन जीव वाघाच्या हल्ल्यात गेल्याने या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या परिसरात कापूस वेचणीचा हंगाम सुरू असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला व पुरुष शेतात मजुरीचे काम करत आहेत. मात्र, सलग वाढत्या वाघहल्ल्यांमुळे शेतकऱ्यांना भीतीच्या छायेत शेतीकाम करावे लागत आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.ग्रामस्थांनी या भागातील वाढत्या वाघांच्या हालचालींवर तत्काळ नियंत्रण आणण्याची आणि वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, दरवर्षी या भागात वाघ हल्ल्यांची मालिका सुरूच असते, मात्र वन विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे भीती आणि संताप दोन्ही वाढत आहेत. सध्या गणेशपीपरी, चेकपिंपरी, आणि लगतच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शेतात न जाण्याचा इशारा दिला आहे.

दोघांचाही बळी घेणारा वाघ एकच ?

आठवडाभरापूर्वी याच गोंडपिंपरी तालुक्यातील चेंकपिपरी येथील भाऊजी पाल हे शेतकरी शेतामध्ये बैल जाण्याकरता गेले होते परंतु सायंकाळ होऊ नये ते घरी परत आले नाही, त्यांची शोधाशोध केली परंतु त्याचा ठाव ठिकाण लागला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी 19 ऑक्टोबरला सकाळी सदर शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे आढळून आले होते. चेंकपिपरी आणि गणेशपिपरी

या दोन्ही गावांचे अंतर फक्त एक किलोमीटर आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्याला आणि आज कापूस वेचणी करत असताना महिलेला ठार मारणारा वाघ हा एकच असावा असा संशय शेतकरी शेतमजूर व्यक्त करीत आहेत. आता वन विभागाला त्याची शहानिशा करून बंदोबस्त करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT