चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मानव–वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात बांबू कटाईचे काम करत असताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने केलेल्या हल्ल्यात दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटना तासाभराच्या अंतराने घडल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सध्या वनविभागाकडून अधिकृत बांबू कटाईचे काम सुरू आहे. या कामासाठी बालाघाट (जि. बालाघाट, मध्यप्रदेश) येथून मजूर बोलावण्यात आले असून, जंगलालगतच्या संवेदनशील भागात हे काम चालू असताना ही दुर्घटना घडली. पहिली घटना मामला परिसरात घडली. बांबू कटाई करत असताना प्रेमसिंग दुखी उदे (मजूर) यांच्यावर वाघाने अचानक झडप घातली. मजुरांना बचावाची संधी मिळण्यापूर्वीच वाघाच्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर अवघ्या तासाभरात महादवाडी परिसरात दुसरी घटना घडली. येथे बांबू कटाईचे काम सुरू असताना बुदशिंग श्यामलाल मडावी (मजूर) यांच्यावरही वाघाने हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा देखील मृत्यू झाला. जिल्ह्यात एकाच दिवशी झालेल्या दोन हल्ल्यांमुळे ताडोबा बफर क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे समोर आला आहे. जंगलालगत काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व वन्यजीव अभ्यासकांकडून होत आहे.
दरम्यान, मानव–वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांनी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून, वर्षभरात अशा संघर्षात तब्बल 47 नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे. यात शेतकरी, मजूर व जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांचा समावेश असून, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ताडोबा बफर क्षेत्रातील या घटनांमुळे जंगलालगत काम करणाऱ्या नागरिक व मजुरांमध्ये भीती पसरली आहे. वनक्षेत्रात काम सुरू असताना सुरक्षा वाढवणे, सतर्कता पथकांची संख्या वाढवणे आणि मजुरांना संरक्षक साधने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.