चंद्रपूर : चंद्रपूर–मूल मार्गावरील केसला घाट परिसरात आठवडाभरापासून एक वाघीण नागरिकांवर धुमाकूळ घालत असून, विशेषतः दुचाकीस्वारांवर झडप घालण्याच्या घटना सतत घडत आहेत. या वाघीणीमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल मार्गावरील प्रसिद्ध केसला घाटातील हनुमान मंदिर परिसर सध्या वाघीणीच्या दहशतीने हादरून गेला आहे. गेल्या आठवडाभरापासून ही वाघीण दुचाकीस्वारांवर हल्ले करत असून, नागरिकांचे दैनंदिन प्रवास भयभीत वातावरणात सुरू आहे.
दोन दिवसापूर्वी सकाळी दुचाकीने जात असलेले एक दाम्पत्य याच घाट मार्गावरून जात असताना वाघीणीने अचानक झडप घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते दोघेही जीव वाचवण्यात यशस्वी झाले. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी नंदू गायकी या दुचाकीस्वारावर हल्ला करून वाघीणीने गंभीर जखमी केले होते. आज सोमवारी सायंकाळीही काही नागरिकांना रस्ता पार करताना वाघीण रस्त्याच्या कडेला दिसल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाघीणीने मागील आठवडाभरापासून केसला घाट परिसरात धुमाकूळ घातला आहे. दररोज या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना तिचे दर्शन होत असून, विशेषतः दुचाकीस्वारांच्या बाबतीत ती अत्यंत आक्रमक वर्तन करत आहे. आश्चर्य म्हणजे, चारचाकी वाहनांबाबत तिने कधीही हल्ल्याचा प्रयत्न केलेला नाही.
दरम्यान, या वाघीणीच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे आता या मार्गाने प्रवास करणे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. चंद्रपूर–मूल मार्ग हा अत्यंत वर्दळीचा असल्याने, दररोज शेकडो दुचाकीस्वार या मार्गाने प्रवास करतात. या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी वनविभागावर निष्क्रीयतेचा आरोप केला आहे. मागील आठवड्यापासून वाघीणीचा उच्छाद सुरू असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. योग्य बंदोबस्त न केल्यास कोणत्याही क्षणी मोठा अपघात किंवा जीवितहानी होऊ शकते.स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी वनविभागाला तातडीने या वाघीणीला पकडून सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी केली आहे.