चंद्रपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली बिटाच्या कक्ष क्रमांक १५४ मध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी घडली. विजय मधुकर मेश्राम (वय अंदाजे २५, रा. जुनोना) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जुनोना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात जाताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मेश्राम हे शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास गुरे चारण्यासाठी मोहर्ली जंगलातील कक्ष क्रमांक १५४ मध्ये गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात विजय यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली.
घटनेची माहिती मिळताच मोहर्ली (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगावकर यांच्यासह पोलीस पथक, मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर तसेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, तर वनविभागानेही आवश्यक नोंद केली.
त्यानंतर विजय मेश्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, वनविभागाकडून मृताच्या आई निरंजना मधुकर मेश्राम यांना घटनास्थळी तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. दरम्यान, हल्ला करणाऱ्या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. तसेच जुनोना गावातील नागरिकांनी जंगल परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेचा पुढील तपास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाकडून सुरू आहे.