Chandrapur Tiger Attack Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack : गुंजेवाहीतील हल्लेखोर वाघीण कॅमेऱ्यात कैद; चार बछड्यांसह घटनास्थळी वावर

चार महिलांचा बळी घेतल्यानंतर वन विभागाची मोठी कारवाई; संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात दहशतीचे सावट, मृतांमध्ये दोन जुळ्या सख्ख्या बहिणींचा समावेश; अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव शोकसागरात

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात चार महिलांचा बळी घेणारी हल्लेखोर वाघीण अखेर वन विभागाने लावलेल्या लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे ही वाघीण चार बछड्यांसह घटनास्थळी फिरताना आढळून आली असून वन विभागाने याला अधिकृत दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गुंजेवाहीसह सिंदेवाही तालुक्यात भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 1836 मध्ये शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही भीषण घटना घडली होती. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर वाघिणीने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. घटनेनंतर वन विभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करत घटनास्थळी 20 ट्रॅप कॅमेरे आणि 3 लाईव्ह कॅमेरे बसविले होते.

वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास लाईव्ह कॅमेऱ्यात संबंधित हल्लेखोर वाघीण दिसून आली. तिच्यासोबत चार बछडेही असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला हल्ला करणारा प्राणी वाघ आहे की वाघीण, याबाबत संभ्रम होता. मात्र आता ती वाघीण असल्याचे निष्पन्न झाले असून तिला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने विशेष कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गुंजेवाहीसह संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असला तरी कालच्या घटनेनंतर अनेक महिला आणि ग्रामस्थ जंगलात जाण्यास धजावत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या भागातील तेंदूपत्ता हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन जुळ्या बहिणींचाही मृत्यू

या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांमध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले (45) आणि अनुबाई दादाजी मोहुर्ले (46) या दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्या दोघी जुळ्या बहिणी होत्या आणि अविवाहित होत्या. तर सुनीता कौशिक मोहुर्ले (33) ही देखील मोहुर्ले कुटुंबातीलच होती.

मृतांमध्ये संगीता संतोष चौधरी (36) हिचाही समावेश असून तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिला दोन लहान मुली असून तिच्या मृत्यूमुळे त्या मुली अक्षरशः पोरक्या झाल्या आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार; गाव शोकसागरात

चारही मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुंजेवाही येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. घरातील कर्त्या महिला गेल्यामुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत होते. गावकऱ्यांनी संबंधित वाघीणीला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली असून वन विभागाने जंगल परिसरात गस्त वाढविली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT