चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील जंगलालगतच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे जनकापूरसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव रमेश जयराम काशीवार (वय ५५) असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगलालगतच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले. यानंतर घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली.
वृत्त लिहेपर्यंत वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याची प्रक्रिया सुरू होती. पंचनामा आणि पुढील कार्यवाही वन विभागाकडून करण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेमुळे जनकापूर व परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जंगलालगतच्या शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्थानिकांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.