Chandrapur Tiger Attack | स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्ही देतो 25 लाखांची मदत!  
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्ही देतो 25 लाखांची मदत!

डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा वनविभागावर संताप; गुंजेवाहीत जाऊन मुख्य वनसंरक्षकांना थेट आव्हान

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे  यांनी थेट गुंजेवाही गाव गाठत वनविभागाच्या धोरणांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.

हातात  २५ लाख रुपयांचा चेक घेऊन गावात पोहोचलेल्या डॉ. गावतुरे यांनी मुख्य वनसंरक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघड आव्हान देत, “सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल, तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो,” असा संतप्त सवाल केला. त्यांच्या या भूमिकेमुळे गावात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

“मृत्यू झाल्यावर मदत, पण प्रतिबंधात्मक उपाय कुठे?”

गुंजेवाही येथे नागरिकांशी संवाद साधताना डॉ. गावतुरे म्हणाल्या की, मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना अनेक वर्षांपासून सुरू आहेत. कधी आईसमोरून लेकरू उचलले जाते, कधी काकाच्या मांडीवरून मुलाला वाघ घेऊन जातो, तर कधी शेतात काम करणाऱ्या महिलांचा बळी जातो. या घटना आता विदर्भातील ग्रामीण भागासाठी रोजचे वास्तव बनले आहे.

त्यांनी सांगितले की, यापूर्वीही या परिसरात तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा चार महिलांना जीव गमवावा लागला. “या महिला कोणाची तरी आई, पत्नी, बहीण होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर वनविभाग २५ लाखांची मदत जाहीर करून आपली जबाबदारी संपल्यासारखे वागतो. पण या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

डॉ. गावतुरे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट टीका करताना म्हटले की, “सर्वसामान्य नागरिकांचा जीव जातो, पण अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त आर्थिक मदतीची घोषणा करतात. त्यांना या मृत्यूचे दुःख होत नाही. जर सामान्य माणसाच्या जीवाची किंमत २५ लाख असेल, तर अधिकाऱ्यांनीही स्वतःला त्या परिस्थितीत उभे करावे.”

त्यांनी पुढे सांगितले की, वनविभाग मृतांच्या कुटुंबीयांना १५ लाख आणि १० लाख अशा टप्प्यांत मदत देतो. “आम्ही मात्र थेट २५ लाखांचा चेक देण्यास तयार आहोत. पण त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वाघाच्या जबड्यात जाण्याची तयारी दाखवावी,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

“वनमंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा”

वाढत्या वाघ हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचा आरोप करत डॉ. गावतुरे यांनी राज्याचे वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

“इतक्या वर्षांपासून लोकांचे जीव जात आहेत आणि परिस्थिती बदलत नाही. जर प्रशासनाला हे थांबवता येत नसेल, तर त्यांनी पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे त्या म्हणाल्या.

गावकऱ्यांमध्ये संताप, प्रशासनावर दबाव

गुंजेवाहीतील चार महिलांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. ग्रामीण भागात शेतात जाणे, जनावरे चारणे किंवा जंगलालगतच्या परिसरात वावरणे धोकादायक बनले आहे. नागरिकांनी वनविभागाकडून केवळ आर्थिक मदतीऐवजी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, डॉ. अभिलाषा गायतुरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वनविभागावर मोठा दबाव निर्माण झाला असून, वाघ हल्ल्यांच्या घटनांकडे प्रशासन आता कोणत्या पद्धतीने पाहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT