Chandrapur Tiger attack
चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची थरारक घटना आज शनिवारी (१०मे) दुपारी जिल्ह्यातील मेंढामाल या गावी घडली. रेखा शेंडे (वय 55), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय 31) असे मृतांचे नावे आहेत.
तिघीही सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल या गावातील रहिवासी होत्या. मृतांमध्ये सासूचा समावेश आहे. मेंढा माल या गावात शोककळा निर्माण झाली आहे. सिंदेवाही तालुक्यात सध्या तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू झाला आहे. आज शनिवारी मेंढामाल गावातील रेखा शेंडे (वय 55), कांता बुद्धाची चौधरी (वय ६०), शुभांगी मनोज चौधरी (वय 31) ह्या महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.
परंतु दुपार होवूनही या तीन महिला घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी काळजी करीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनंतर ही माहिती वन व पोलीस विभागाला देण्यात आली.
लगेच वन व पोलीस विभागाचे अधिकारी मेंढामाल या गावात दाखल झाले. त्यांनी तत्काळ पत्ता तोडाई सुरू असलेल्या जंगलात शोध मोहीम राबविली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास डोंगरगाव बीटातील 1355 कंपार्टमेंट मध्ये मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदना करता पाठविण्यात आले. या घटनेमुळे शिंदेवाही परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे तसेच मेंढा माल गावात या घटनेची माहिती होताच शोककळा पसरली.
डोंगरगाव बीटात एक वाघीण बछड्यांसह भ्रमंती करीत असल्याचे काही नागरिकांना आढळून आले आहे. त्यामुळे या तिघींनाही वाघिणीनेच ठार केल्याची चर्चा आहे.