चंद्रपूर : मजुरांना नाश्ता देऊन परतताना ट्रॅक्टरखाली सापडून १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२६) सकाळी १०.३० च्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या नवरगाव रेतीघाटावर घडली. श्रीकांत रामलाल बट्टे (वय १५) असे या मुलाचे नाव आहे. विकास तुळशीराम बट्टे (रा. अहेर नवरगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक नितेश रामचंद्र राऊत (वय २४) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ब्रम्हपुरी तालुक्यातील अऱ्हेर नवरगाव गावातील ट्रॅक्टर चालक नितेश राऊत याने श्रीकांत बट्टे या मुलाला रेती घाटावरील मजुरांना नाश्ता नेऊन देण्यासाठी अऱ्हेर नवरगाव चिकलधोकडा घाटावर नेले. रेती घाटावरून ट्रॅक्टरने (क्रमांक एम एच ३४ सी जे ८१८०) परत येत असताना श्रीकांत हा ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसला होता. ट्रॅक्टर चालक नितेश रामचंद्र राऊत याने ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालविल्याने श्रीकांतचा तोल गेला व तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडला. त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी फिर्यादी विकास बट्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नितेश रामचंद्र राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला. या घटनेमुळे अहेर नवरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.