Chandrapur Teacher Protest | हजारो शिक्षकांच्या एल्गाराने चंद्रपुरात १,५५० शाळा ठप्प! 
चंद्रपूर

Chandrapur Teachers Protest | हजारो शिक्षकांच्या एल्गाराने चंद्रपुरात १५५० शाळा ठप्प!

धरणेआंदोलनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; गैरशैक्षणिक कामांतून मुक्तता, टीईटी रद्द व जुनी पेन्शनसह विविध मागण्या

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : राज्यभर पुकारण्यात आलेल्या 'शाळा बंद' आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी (दि९)उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे १,५५० शाळा बंद ठेवण्यात आल्या, तर हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षकांना गैरशैक्षणिक कामांतून मुक्त करणे, टीईटीची सक्ती रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, स्नातक शिक्षकांना समान वेतनश्रेणी देणे तसेच एसआयआर कामांबाबत प्रशासनाकडून होणारी सक्ती थांबविणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

शिक्षक संघटनांनी शासनाकडून अनेक वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातही 'शाळा बंद' आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व चानकुमार खोब्रागडे, कालिदास येरगुडे, विपिन धावेकर, राजू लांजेकर, अशोक राऊत, किशोर आनंदवार, सतीश बावणे, अरुण खराते, बंडूजी राठोड, अविनाश जुमडे, प्रकाश कुमरे, प्रमोद कांबळे, प्रदीप पावडे, विजय कुमरे, अमोल ठेटे, सुरेश वारोकर व नंदकिशोर शेरकी यांनी केले. विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षक संघटनांनी सांगितले की, निवडणूक, बीएलओ, शालेय पोषण आहार, विविध सर्वेक्षणे आणि एसआयआर यांसारख्या गैरशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे. शिक्षकांवरील वाढत्या कामाच्या ताणामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

सभेत वक्त्यांनी हा संघर्ष केवळ शिक्षकांचा नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना अध्यापनावर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

सभेत चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे व कोरपना तहसीलदार पल्लवी आखरे यांनी एसआयआर कामाच्या संदर्भात शिक्षकांशी केलेल्या कथित अयोग्य वर्तनाचा निषेध करण्यात आला. शिक्षकांवर अनावश्यक दबाव आणला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आंदोलन सुरू असताना सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले; मात्र पावसाची पर्वा न करता शिक्षक आंदोलनस्थळी ठामपणे उभे राहिले. पाऊस थांबताच पुन्हा सभा व घोषणाबाजीला सुरुवात झाली. त्यामुळे आंदोलनाचा उत्साह अखेरपर्यंत कायम राहिला.

या आंदोलनात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, कास्ट्राईब कल्याण महासंघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीसह विविध शिक्षक संघटनांचा सहभाग होता.

आंदोलनातील प्रमुख मागण्या

सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी.

◾टीईटीची सक्ती तातडीने रद्द करावी.

◾बीएलओ, एसआयआर व इतर गैरशैक्षणिक कामांतून शिक्षकांना मुक्त करावे.

◾विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे.

◾शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत.

◾स्नातक शिक्षकांना समान वेतनश्रेणी लागू करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT