Talodhi Forest Range Train Hit Deer
चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीट, कक्ष क्रमांक ९४ येथे रेल्वेच्या धडकेत पाच वर्षीय नर चितळाचा मृत्यू झाला. रेल्वे विभागाकडून माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक तोरले, वन्यजीव अभ्यासक तथा SWAB संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव पथक प्रमुख जीवेश सयाम यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
मृत चितळाचा मृतदेह सावरगाव वन डेपो येथे नेण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा आकरे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वी याच परिसरात रेल्वेच्या धडकेत अस्वलाचाही मृत्यू झाला होता. गेल्या वर्षभरात या रेल्वेमार्गावर गौर, चितळ, सांबर यांसह अनेक वन्यजीवांचा रेल्वे अपघातात बळी गेला आहे.
गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्ग जंगल परिसरातून जात असल्याने वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वन्यजीवांचे रेल्वे अपघात रोखण्यासाठी जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूंना जाळीदार कुंपण उभारावे आणि आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षित मार्गिका निर्माण कराव्यात, अशी मागणी स्वाब संस्थेने केली आहे.