Talodhi Balapur Youth Found Dead
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथे शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. जवाहर सेवा सहकारी सोसायटीच्या पाठीमागील परिसरात राहुल विजय मेश्राम (वय १९) रा. सराई वॉर्ड, तळोधी (बा.) याचा मृतदेह आढळून आला. राहुलच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांसह मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल मेश्राम हा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले विजय मेश्राम यांचा मोठा मुलगा होता. तो तळोधी बाळापूर परिसरात एक उत्साही डान्सर म्हणून परिचित होता. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि स्थानिक कार्यक्रमांमध्ये तो उत्स्फूर्तपणे सहभागी होत नृत्य सादर करीत असे. आपल्या नृत्यकलेमुळे त्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. मनमिळावू आणि उत्साही स्वभावामुळे मित्रपरिवारातही तो लोकप्रिय होता.
शुक्रवारी सकाळी राहुलचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटनेची माहिती तळोधी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक पुरावे व नमुने संकलित केले. त्यानंतर राहुल मेश्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, राहुलचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू आत्महत्या आहे की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि पोलिसांच्या तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.