चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील प्रसिद्ध वाघीण 'छोटी मधू'ने पुन्हा एकदा आपल्या मातृत्वाची अनोखी झलक दाखवत पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींची मने जिंकली आहेत. मोहर्ली मार्गावर दोन बछड्यांना अत्यंत संयमाने आणि सतर्कतेने सुरक्षितपणे रस्ता ओलांडून देतानाचे तिचे हृदयस्पर्शी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील 'छोटी मधू' ही वाघीण पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरली आहे. मात्र, यावेळी तिच्या शिकारीपेक्षा आई म्हणून तिने पार पाडलेल्या जबाबदारीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मोहर्ली मार्ग ओलांडताना 'छोटी मधू' सर्वप्रथम रस्त्याच्या कडेला थांबली. तिने कोणतीही घाई न करता आपल्या दोन्ही बछड्यांची वाट पाहिली. काही क्षणांत पहिला बछडा रस्ता ओलांडून आईजवळ पोहोचला. त्यानंतरही छोटी मधूने पुढे न जाता दुसऱ्या बछड्याची प्रतीक्षा केली. काही वेळाने दुसराही बछडा रस्त्यावर आला. दोन्ही बछडे रस्त्यावर काही क्षण मनमोकळेपणाने थांबले आणि इकडे-तिकडे पाहू लागले. त्या वेळी छोटी मधू त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत सावध उभी राहून कोणताही धोका निर्माण होऊ नये, याची दक्षता घेत होती.
बछडे पूर्णपणे सुरक्षित झाल्याची खात्री झाल्यानंतरच तिने पुढे जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. आई म्हणून आपल्या पिल्लांच्या सुरक्षेला तिने दिलेले सर्वोच्च प्राधान्य या दृश्यातून प्रकर्षाने दिसून आले.
या घटनेमुळे मोहर्ली मार्गावरील वाहनांची काही काळ रहदारी थांबली होती. मात्र, रस्त्यावरील पर्यटक आणि वाहनचालकांनी कोणताही गोंधळ न घालता शांतपणे थांबून हा दुर्मीळ क्षण प्रत्यक्ष अनुभवला. अनेकांनी आपल्या मोबाईल आणि कॅमेऱ्यांत हे दृश्य टिपले.
व्याघ्रदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना आणि आईच्या ममतेचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी 'छोटी मधू'च्या संयमाचे, सतर्कतेचे आणि मातृत्वाचे भरभरून कौतुक केले असून, "आई ही आईच असते—मग ती माणसांची असो वा जंगलाच्या राणीची," अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनाचे आणि निसर्गदत्त मातृत्वाचे दर्शन घडवणारे हे दृश्य ताडोबाच्या समृद्ध जैवविविधतेची आणि वन्यजीव संवर्धनाच्या महत्त्वाची पुन्हा एकदा जाणीव करून देणारे ठरले आहे.